लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली रवि मंडावार— गडचिरोली जिल्ह्यात काल संध्याकाळी आणि रात्री अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. यामुळे संपूर्ण शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार वाऱ्यांसह झालेल्या या पावसामुळे गडचिरोली शहरात अनेक ठिकाणी झाडे पडली असून, त्यामुळे विद्युत वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी, शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
रात्री अंदाजे दोन वाजताच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातच वादळ वाऱ्यांचा जोर वाढला. काही ठिकाणी वीजेंच्या कडकडाटासह, मेघगर्जना करीत मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वादळामुळे गडचिरोलीतील काही व्यावसायिक संकुलांमध्ये नुकसान झाल्याचे समोर आले आहे. कॉम्प्लेक्सजवळील काही दुकानांची छप्परे उडाली असून, रात्री झालेल्या पावसामुळे संपूर्ण शहरभरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. तसेच, काही घरांच्या छतांचेही नुकसान झाल आहे.
या पावसामुळे शेतीतील पिकांना फटका बसला आहे. यामध्ये मका आणि भात पिकांचे नुकसान झाल आहे.
दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. काही भागात वीजपुरवठा सुरळीतही झाला आहे तर काही भागात काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
हवामान विभागाने यापूर्वीच गडचिरोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.