लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आलापल्ली वनविभागात बोगस मजुरांची नावे दाखवून, खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे व्हाऊचर तयार करत कोट्यवधी रुपयांच्या अफरातफरीचा गंभीर आरोप उफाळून आला असून, या प्रकरणामुळे विभागात प्रचंड खळबळ माजली आहे. संबंधित प्रकरणात वन परिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांना तात्काळ निलंबित करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, आलापल्ली, पेरमिली व पेंडीगुडम परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बोगस मजुरांची नावे दाखवून शासनाच्या निधीचा अपहार करण्यात आला. या संदर्भात वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री, वनमंत्री आणि वनसचिव यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रारी देऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या निषेधार्थ मागील शंभर दिवसांहून अधिक काळ ठिय्या आंदोलन सुरू असूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
दरम्यान, वनविभागाकडून गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या निष्पक्षतेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. समितीतील सदस्य हे त्याच विभागातील व समान कॅडरमधील असल्याने चौकशी ‘निष्पक्ष’ कशी राहील, असा सवाल उपस्थित केला जात आहे. उलट, संबंधित अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
तक्रारकर्त्याने मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली यांच्याकडे निवेदन देत, स्वतंत्र व बहुविभागीय चौकशी समिती गठीत करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये इतर विभागातील अधिकारी, तहसीलदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश करून संपूर्ण चौकशी व्हिडिओग्राफीद्वारे तक्रारकर्त्यासमक्ष पार पाडावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
सदर अधिकारी पदावर कायम असल्यास चौकशीत हस्तक्षेप होण्याची शक्यता व्यक्त करत, त्यांना तात्काळ निलंबित करणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अन्यथा सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वनविभागातील या कथित घोटाळ्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून ठोस कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.