लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वसई दि ६ जुलै :- वसईचे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे आणि माणिकपूरचे मंडळ अधिकारी संजय
सोनावणे यांना लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रांगे हात पकडले आहे. वसई पूर्वेच्या गोखिवरे येथील जमिनीचे फेरफार रद्द करण्यासाठी या दोघा अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडून २ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील दीड लाख रुपये रक्कम स्वीकारताना पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांना न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वसई पूर्वेच्या गोखीवरे येथे भूमापन क्रमांक २३३ हिस्सा क्रमांक अ/३ येथे तक्रार दार यांनी जमीन विकत घेतली होती. या जमिनीचा फेरफार रद्द करण्यासाठी वसईचे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे (५३) यांनी २ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदार यांनी ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी सापळा लावण्यात आला होता. दुपारी ३ वाजता माणिकपूर विभागाचे मंडल अधिकारी संजय सोनवणे यांना मुकणे यांच्या वतीने दीड लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर ४ वाजता मुकणे यांना कार्यालातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
मुकणे आणि सोनावणे यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी मुकणे आणि सोनावणे यांच्या घरात छापे मारून झडती घेतली. सोनवणे याच्या अंग झडतीमध्ये अडीच लाख रुपये सापडले तर त्याच्या घरात चार लाखांची बेहशोबी रोकड आढळली. पोलीस त्याच्या एकूण मालमत्तांचा तपास करत आहेत मंगळवारी रात्री उशीरापर्यंत या दोघांच्या घरांची झडती घेण्याचे काम लाच लुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे सुरु होते. सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती यांच्या पथकाने केली.
दरम्यान,या वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे वसईतील नागरिकांनीत समाधान व्यक्त करत दोघांच्याही मालमत्तांची तपासणी करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.