लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ठाणे, दि. २० एप्रिल: ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे आज ठाण्यात कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झाले. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या या अभिनेत्याला कोरोनाने ग्रासलं होतं. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण कोरोनाविरोधातील त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी १२.३० च्या सुमारास ठाणे इथे अखेरचा श्वास घेतला.
किशोर नांदलस्कर यांच्या पश्चात पत्नी आणि तीन कुटूंबे असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी किशोर नांदलस्कर यांना दम लागणे, छातीत धडधडणे असे शारीरिक त्रास सुरू झाले होते. वैद्यकीय तपासांनंतर त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव खारेपाटण मात्र त्यांचा जन्म मुंबईचाच. नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडीलांकडून मिळाला होता. नांदलस्कर यांनी सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच 20 हून अधिक मालिकांमधून काम केले आहे. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक नव्याने पुन्हा रंगभूमीवर सादर झालं. या नाटकातील ‘राजा’ची भूमिका तसेच दिलीप प्रभावळकर यांनी लोकप्रिय केलेले ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने रंगभूमीवर सादर झालं. यात प्रभावळकर यांची भूमिका नांदलस्कर यांना साकारायची संधी मिळाली. व्यावसायिक रंगभूमीवर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.
महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. जिस देश में गंगा रहता है, तेरा मेरा साथ है, खाकी, हलचल, सिंघम या हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या