लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
एटापल्ली, ता. २२ : शहरातील राजीव गांधी चौकात गुरुवारी रात्री घडलेली हृदयद्रावक घटना पुन्हा एकदा स्थानिक प्रशासनाच्या अपयशाचा आरसा ठरली आहे. वर्दळीच्या ठिकाणी मोकाटपणे फिरणाऱ्या जनावरांवर नगरपंचायतीने नियंत्रण न ठेवल्यामुळे एका निष्पाप बैलाचा करुण अंत झाला. अपघात एवढा भीषण होता की, जागीच त्या बैलाने तडफडून प्राण सोडले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप उसळला असून, नगराध्यक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात ‘पशूवधाचा’ गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
वास्तविक, एटापल्ली शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव हा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. मुख्य चौक, रस्ते व शाळा परिसरात या जनावरांचे मुक्त संचार आहे. वाहनचालकांनी, स्थानिक नागरिकांनी याविषयी वारंवार तक्रारी, निवेदने दिली, पत्रव्यवहार केला, परंतु नगरपंचायतीच्या दरबारात त्या साऱ्यांचे फडशा पाडले गेले. ना कुठली मोहीम राबवली, ना निवाऱ्यांची व्यवस्था केली. परिणामी, कालच्या अपघातासारख्या दुर्दैवी घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत.
कालच्या घटनेत, रात्री ११.३४ वाजता एक दुचाकी चालक भरधाव वेगात येत असताना राजीव गांधी चौकात रस्त्यावर उभा असलेला बैल त्याच्या आड आला. चालक थोडक्यात बचावला, परंतु बैल जबर धडकेत गंभीर जखमी झाला आणि काही मिनिटांतच त्याचा तडफडून मृत्यू झाला. या दृश्याने परिसरातील लोक सुन्न झाले, काहींनी थेट प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
नागरिकांचे म्हणणे आहे की, ही केवळ एका बैलाची नव्हे, तर व्यवस्थेच्या संवेदनशून्यतेची हत्या आहे. अपघातानंतर त्याठिकाणी ना वैद्यकीय मदत पोहोचली, ना प्रशासनाचा एकही प्रतिनिधी घटनास्थळी आला. एखादा पशूही वेदनाविना मृत्यू पावेल अशी तरतूद असताना, मोकाट जनावरांच्या बाबतीत प्रशासन ठोस पावले उचलत नाही, हे अत्यंत लाजिरवाणं आहे.
स्थानिकांनी आता थेट ‘पशूवधाचा गुन्हा’ नगराध्यक्षांवर दाखल करण्याची मागणी केली आहे. “या प्रकाराची जबाबदारी कुणी तरी स्वीकारली पाहिजे, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांची मुख्य मागणी पुढीलप्रमाणे आहे —
- मोकाट जनावरांसाठी शासकीय निवारा व्यवस्था तातडीने निर्माण करावी..
- नगरपंचायतीकडून नियमित जनावर पकड मोहीम राबवावी..
- प्राण्यांच्या संरक्षणासाठी हेल्पलाइन वा रेस्क्यू टीमची स्थापना करावी..
- अपघातग्रस्त प्राण्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवणारी व्यवस्था उभारावी..
- दोषी अधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी..
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “एखादं मनुष्यप्राणी गेला असता तर प्रशासन हललं असतं, पण मुक्या जीवाच्या मृत्यूकडे त्यांचे दुर्लक्ष अपमानास्पद आहे.” बैलाचा मृत्यू ही अपघात नव्हे, तर ढिसाळ कारभाराचा परिणाम आहे, हे लक्षात घेऊन यावेळी निष्क्रीयतेस वाऱ्यावर न सोडता शासनाने ठोस भूमिका घ्यावी, हीच सध्याची काळाची गरज आहे.