काटोलमध्ये शेकापचा विदर्भस्तरीय मेळावा

गडचिरोलीहून शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती निश्चित; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनिती ठरणार...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली ७ जून :राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली असताना, शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पुन्हा एकदा संघटनात्मक ताकदीची चुणूक दाखवत विदर्भस्तरावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार, १० जून रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे विदर्भस्तरीय मेळावा पार पडणार असून या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील महिला नेत्या जयश्रीताई जराते आणि जेष्ठ नेते भाई शामसुंदर उराडे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते काटोलच्या दिशेने प्रयाण करणार असून, हा मेळावा गडचिरोली शेकापच्या संघटनात्मक एकजुटीचे दर्शन घडवणारा ठरणार आहे. जिल्ह्यातील विविध आघाड्यांचे प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते, युवक-विध्यार्थी संघटनांचे सदस्य, महिलाप्रमुख व आंदोलक कार्यकर्ते यांचीही या मेळाव्यासाठी विशेष तयारी सुरु आहे.

पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत निवडणुकीची रणनिती ठरणार..

या मेळाव्याला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, माजी आमदार भाई बाळाराम पाटील, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, खजिनदार व आर्किटेक्ट अतुल म्हात्रे, कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, पाॅलिट ब्युरो सदस्य प्रा. एस.व्ही. जाधव, तसेच सहचिटणीस बाबासाहेब देवकर, राहुल देशमुख आणि चिटणीस मंडळाचे सदस्य रामदास जराते, अ‍ॅड. मानसीताई म्हात्रे, डॉ. अनिकेत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्यात पक्षाची निवडणूक रणनिती, स्थानिक आघाड्यांतील धोरणात्मक भूमिका, संघटनात्मक पुनर्रचना, कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या आणि उमेदवार निवडीसंदर्भातील प्राथमिक आढावा घेतला जाणार आहे. तसेच, शेतकरी, कामगार, अल्पसंख्याक, आदिवासी व युवक वर्गाशी संबंधित प्रश्नांवर आगामी काळात कोणत्या स्वरूपात लढा उभारायचा, यावरही स्पष्ट भूमिका घेण्यात येईल.

गडचिरोली शेकापच्या नेतृत्वाचे एकत्रित आवाहन..

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेकापच्या सर्व आघाड्यांनी एकत्रितपणे जोरदार तयारी केली आहे. मंगळवारी १० जून रोजी सकाळी ६ वाजता सर्व कार्यकर्त्यांनी शेकाप जिल्हा कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा शेकापचे प्रमुख नेते चंद्रकांत भोयर, रमेश चौखुंडे, तसेच शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबनवाडे, महामार्ग बाधित आघाडीचे प्रभाकर गव्हारे, अल्पसंख्याक आघाडीचे शोएब पटेल, आदिवासी आघाडीचे रामदास आलाम, भटक्या विमुक्त आघाडीचे डंबाजी भोयर, शिक्षक आघाडीचे शर्मीश वासनिक, युवक आघाडीचे गुड्डू हुलके, महिला जिल्हाध्यक्ष कविता ठाकरे, विद्यार्थीदशा आघाडीचे अभिलाषा मंडोगडे यांनी केले आहे.

संघटना हेच बळ’ – शेकापची विदर्भात पुन्हा दमदार पावले..

सामान्य जनतेच्या प्रश्नांवर दीर्घकाळ आंदोलने उभारणाऱ्या आणि ग्रामपातळीवरील नेतृत्वाचे जाळे मजबूत ठेवणाऱ्या शेकापने या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा विदर्भात आपली ताकद प्रस्थापित करण्याचा निर्धार घेतला आहे. शेतीमालाचे भाव, जंगल हक्क, रोजगार हमी, महामार्ग बाधितांचे प्रश्न, आदिवासी व भटक्या-विमुक्तांचे हक्क – या सगळ्यांशी निगडीत संघटित लढ्याचे पुढचे पाऊल हे काटोलच्या मेळाव्यातून निश्चित होणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे..