लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी:२१ फेब्रुवारी, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 9 बटालियनने नागरी कृती कार्यक्रमांतर्गत रेपणपल्ली तहसील अहेरी गावात चालक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. CRPF 9 बटालीयन ने गावातील बेरोजगार तरुणांना कौशल्यपूर्ण व स्वावलंबी बनवून समस्या सोडविल्या. वरील काम 09 बटालीयन कमांडंट आर एस बाळापुरकर यांच्या नेतृत्वाखाली, असिस्टंट कमांडंट गौतम सरकार यांनी पूर्ण केले. गडचिरोली जिल्ह्यातील अतिमागास भागात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारत सरकारच्या वतीने ग्रामस्थांच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत असल्याचा संदेश कमांडंट बाळापूरकर यांनी दिला आहे. याच अनुषंगाने नागरी कृती कार्यक्रमांतर्गत चालक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून गावातील बेरोजगारांचा प्रश्न सोडविण्यात आला.
यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने सहा. कमांडन्ट गौतम सरकार, स्थानिक पोलीस उप पोलीस स्टेशन रेपनपल्ली पीएसआय पांडुरंग हाके, बिमरगुडा गावच्या सरपंच सौ.लक्ष्मीबाई मडावी, सरपंच विलास नेरला, स्थानिक पत्रकार व कमलापूर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच छलेवाडा गावातील नागरिक उपस्थित होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या या प्रयत्नाचे सर्वांनी कौतुक केले.