गाव विकासासाठी ‘दारूमुक्त निवडणूक’ गरजेची

धानोरातील ३१ गावांनी घेतला ठराव.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धानोरा  11 जानेवारी :– धानोरा तालुक्यातील ३१ गावांनी ‘ग्रामपंचायत निवडणूक -दारूमुक्त निवडणूक’ करण्याचा ठराव घेतला आहे. दारूचे आमिष दाखवून निवडणून येणारा उमेदवार गावाचे वाटोळे करील. गाव विकासासाठी दारूमुक्त निवडणूक गरजेची आहे. यासाठी जिल्ह्यातील २७१ गावांनी पुढाकार घेतला आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवारांना दारूचे वाटप करू देणार नाही, नशेत मतदान करणार नाही. असा निर्धार या गावांनी केला आहे. 

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दारूचे वाटप होण्याची शक्यता असते. यावर नियंत्रण ठेवत दारूमुक्त निवडणूक करण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील २७१ गावांनी ठराव घेतला आहे. गावात दारूचा शिरकाव होऊ देणार नसल्याचा निर्धार केला आहे. यात धानोरा तालुक्यातील ३१ गावांनी ठराव घेत दारूमुक्त निवडणुकीचा संकल्प केला आहे. यात हलकनार, काकडयेली, गोटाटोला, दराची, आंबेझरी, कारेमरका, ढवरी, मकेपायली, रेखटोला, परसवाडी, चिंचोली, यदासगोंदी, दुधमाळा, मेंढाटोला, कांदळी,पुसावंडी, मुरुमगाव, चुडियाल, निमगाव, मोडेभट्टी, जांगदा बूज, तळेगाव चक, चिंगली, सालेभट्टी , ढोरगट्टा, मुसंडी, पेकिन मुडझा, सावंगा बु, चिमीरिकल, कामनगड, साखेरा.  या गावांनी दारूमुक्त निवडणूक करण्याचा ठराव घेतला आहे. यामुळे निश्चितच योग्य उमेदवाराची निवड करून ग्राम विकासाला चालना मिळणार.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्याचा जिल्ह्यातील गावांचा मानस आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही विधानसभा मतदार संघातील प्रमुख राजकीय व अपक्ष मिळून नऊ उमेदवारांनी मतदारांना दारूचे प्रलोभन देणार नाही आणि दारूचा वापर करणार नाही. असा वचननामा लिहून दिला होता. यापूर्वी लोकसभा निवडणुकीतही दारू वितरित करण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्याचप्रकारे यंदाची ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्यासाठी गावागावात ठराव घेऊन प्रयत्न केल्या जात आहे.

daru mukthigadchiroli electionmukthipath