‘विदर्भाची काशी’ श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिरावर माहितीपटाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विमोचन…

गडचिरोलीच्या सांस्कृतिक वैभवाला मिळाला दृक्श्राव्य माध्यमातून नवा आवाज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली | प्रतिनिधी: गडचिरोली जिल्ह्याच्या धार्मिक आणि पुरातत्त्वीय वैभवाचा दिमाखदार वारसा लाभलेल्या श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिरावर आधारित माहितीपटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच नागपूर येथील नियोजन भवनात औपचारिक अनावरण करण्यात आले. ‘विदर्भाची काशी’ या उपाधीने सन्मानित या प्राचीन शिवपीठाचे इतिहास, स्थापत्य, सांस्कृतिक परंपरा आणि अध्यात्मिक महत्त्व यांचा समावेश या सहा मिनिटांच्या माहितीपटात प्रभावीपणे करण्यात आला आहे.

या प्रसंगी राज्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

संस्कृती आणि अध्यात्माची दृश्य यात्रा..

जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेला हा माहितीपट जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि राज्याचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाला आहे. हे दृश्य माध्यम फक्त माहिती देणारे नव्हे, तर भाविकांना आणि रसिकांना श्रीक्षेत्राच्या दरबारात नेणारे अध्यात्मिक प्रवेशद्वार ठरत आहे.

या माहितीपटात वैनगंगा नदीच्या काठावरील प्राचीन मार्कंडा मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी, शिल्पकलेतील बारकावे, रामायण-महाभारताशी असलेले संदर्भ, आणि नागर स्थापत्यशैलीतील देखणे मूर्तिशिल्प प्रभावीपणे सादर करण्यात आले आहे. मंदिरातील ‘विदर्भाचे खजुराहो’ म्हणवली जाणारी कोरीव कामे, भाविकांची श्रध्दा, महाशिवरात्र व श्रावण सोमवारी नोंदवले जाणारे लाखोंचा जनसागर – याचे दृक्श्राव्य दर्शन या माहितीपटात दिसून येते.

पर्यटन आणि जतन यांना चालना..

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या या विमोचनानंतर उपस्थित मान्यवरांनी या माहितीपटाच्या माध्यमातून श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिराची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, आणि हे स्थान राज्याच्या पर्यटन नकाशावर आणखी ठळकपणे अधोरेखित होईल, असा विश्वास व्यक्त केला.

श्रीक्षेत्र मार्कंडा हे केवळ एक धार्मिक स्थान नाही, तर ते एक सांस्कृतिक वारसास्थळ आहे, जिथे शिल्प, संगीत, भक्ती आणि इतिहासाचे अद्वैत नांदते. त्यामुळे येथील विकासासाठी पर्यटनखात्याने, वनखात्याने आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तरीत्या प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली.

स्थापत्यशास्त्राची जिवंत उदाहरणे…

मंदिराच्या गर्भगृहापासून शिखरापर्यंत कोरलेल्या देवता, मिथककथा, आणि जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या आकृती या माहितीपटात सजीव होतात. जुन्या काळातील मंदिरे म्हणजे केवळ पूजा-अर्चेची ठिकाणे नव्हती, तर ती शास्त्र, कला, गणित, खगोलशास्त्र आणि स्थापत्यकलेचा संगम असायची – याचे हे जिवंत उदाहरण म्हणून श्रीक्षेत्र मार्कंडा उभे आहे.

गडचिरोलीचा नवा सांस्कृतिक चेहरा..

या माहितीपटाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्याच्या ‘लाल’ ओळखीच्या पलिकडचे ‘सांस्कृतिक’ आणि ‘आध्यात्मिक’ दर्शन देशभरातील प्रेक्षकांना होणार आहे. जिल्हा प्रशासनाने केलेला हा प्रयत्न, केवळ माहितीपटापुरता मर्यादित न राहता, एक सुसंस्कृत पर्यटन धोरण, वारसा संवर्धनाची दिशा आणि आर्थिक प्रगतीचा भाग बनावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

श्रीक्षेत्राचं उज्ज्वल भविष्य..

या माहितीपटाच्या माध्यमातून श्रीक्षेत्र मार्कंडा आता डिजिटल युगात आपली पावन कथा सांगायला सज्ज झाला आहे. हे केवळ मंदिर नव्हे, तर विदर्भाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीचा दीपस्तंभ आहे. शासनाच्या, प्रशासनाच्या आणि समाजाच्या संयुक्त प्रयत्नातून ही ओळख देशभर पोहोचावी, हीच या माहितीपटामागची प्रेरणा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

Gadchiroli TourismMarkhandaविदर्भाची काशी