गुजरातला किती उद्योग गेले याची उद्योगमंत्र्यांनी श्वेत पत्रिका काढावी, विजय वडेट्टीवार यांचे आव्हान

महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला नख लावणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नाशिक –  राज्यात महिला आणि बालिकांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी जून पर्यंत 2147 बालिकांवर अत्याचार करण्यात आले आहेत.महाराष्ट्रात महिला आणि बालिका मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत आहेत, अशा वेळी हे महाविनाशी सरकार महिलांचे संरक्षण करण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहे अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

नाशिक येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीनंतर वडेट्टीवार बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या कारभाराची चिरफाड करत सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.

वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभेत लोकांनी महायुती सरकारला नाकारले म्हणून महायुतीने लाडकी बहिण योजना आणली. येत्या विधानसभा निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी महायुतीचा हा प्रयत्न आहे. खरं तर पंधराशे रूपयांपेक्षा माता-भगिनीं, चिमुकल्यांना संरक्षण देण्याची गरज आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यात महायुती सरकार अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी अशा योजना आणल्या जात आहेत. जनता या महाविनाशी सरकारला विटली असून या महाविनाशी सरकारची नितीमत्ता भ्रष्ट झाली असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. बेशुद्ध महायुतीला शुद्धीवर आणण्यासाठी येत्या 24 तारखेचा बंद यशस्वी करा, असे आवाहन करत हा बंद राजकीय नसल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्राला आता अस्थिर केले जात आहे. महाराष्ट्राचे पुरोगामित्व संपवण्याचे काम महायुती सरकार पद्धतशीर करत आहे. एकमेकांच्या धर्माबद्दल अपशब्द बोलून दंगली पेटवल्या जात आहेत. महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या वाढते आहे. उद्योग बाहेर जात आहेत. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी श्वेत पत्रिका काढून गुजरातला किती उद्योग गेले ते सांगितले पाहिजे.

 

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकविधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार