दुधमाळा येथे रक्तदान-आरोग्य तपासणी शिबिरात गावाचा उत्साह, तरुणाईचा आदर्श

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील दुधमाळा गावाने नवरात्र उत्सव केवळ धार्मिक उत्साहात नव्हे तर सामाजिक बांधिलकीची जाणीव जागवत साजरा केला. १२–१३ वर्षांपासून गावकऱ्यांनी एकोपा आणि सर्वधर्मसमभाव जपत आयोजित होणाऱ्या सार्वजनिक नवदुर्गा उत्सवात यावर्षी समाजहिताचे अनेक उपक्रम राबविण्यात आले. शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी झालेल्या रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराने या परंपरेला नवी उंची दिली.

सकाळपासूनच ग्रामस्थांच्या स्वयंप्रेरित सहभागामुळे शिबिराला उत्साहाची उधळण लाभली. सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ, जनहित ग्रामीण विकास बहुद्देशीय संस्था येणापूर आणि मेरा युवा भारत गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात १७ तरुणांनी स्वखुशीने रक्तदान केले. यामध्ये राकेश उईके आणि चंद्रिका उईके या दाम्पत्याने सातव्यांदा रक्तदान करून गावाच्या अभिमानात भर घातली. विशेष म्हणजे संपूर्ण शिबिरात चंद्रिका उईके या एकमेव महिला रक्तदात्या ठरल्या आणि तरुणींना प्रेरणादायी संदेश दिला.

रक्तदानाबरोबरच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, दुधमाळा यांच्या सहकार्याने १२० नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक औषधोपचार देण्यात आले. गावातील वृद्ध, महिला आणि तरुणांपासून शालेय मुलांपर्यंत सर्वांनी उत्साहाने भाग घेतला.

 

शिबिराचे उद्घाटन सरपंच माया उसेंडी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच यशवंत मोहुर्ले, ग्रामपंचायत सचिव डोहे मॅडम, सदस्य मंदा उईके, वैद्यकीय अधिकारी डॉ. गेडाम मॅडम, तलाठी डोंगरे, अविनाश पोरेटी आदी मान्यवर उपस्थित होते. गडचिरोली रक्त संकलन केंद्राची चमु आणि धानोरा येथील वैद्यकीय अधिकारी तसेच उपकेंद्रातील  समुदाय आरोग्य अधिकारी नेहा राळेकर, गिरीश लेनगुरे, सदाशिव मंडावार आरोग्य कर्मचारी, पंचबाई क.आरोग्य सेविका आणि आशाकार्यकर्त्या शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Blood Donation CampDhudhmalaDonated the blood Save many lifeधानोरा