ताडगाव जंगल परिसरात जहाल माओवादी अटकेत

गडचिरोली पोलिसांची कारवाई; खून व जाळपोळासह चार गुन्ह्यांत सहभाग; दोन लाखांचे बक्षीस घोषित..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी हिंसेवर आणखी एक मोठा आघात करत गडचिरोली पोलिस दलाने जहाल माओवादी शंकर भिमा महाका (वय 32, रा. परायनार, ता. भामरागड) याला ताब्यात घेतले. ताडगाव जंगल परिसरात घातपाताची रेकी करताना तो पोलिसांच्या विशेष अभियान पथकाला हाती लागला. राज्य शासनाने त्याच्या अटकेवर दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. खून, जाळपोळ व पोलिसांविरोधातील विध्वंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेला हा माओवादी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे नोंद असलेल्या खुनाच्या प्रकरणातही पाहिजे होता.

जंगलात रेकी करताना सापळ्यात..

दि. 13 सप्टेंबर रोजी भामरागड उपविभागातील तिरकामेटा जंगल परिसरात विशेष पोलिस पथक मोहिमेवर असताना संशयास्पद हालचाल करणारा एक व्यक्ती आढळून आला. चौकशीअंती त्याची ओळख शंकर भिमा महाका, सदस्य भामरागड दलम अशी पटली. तो गेल्या काही वर्षांपासून परायनार व परिसरातील जंगलात राहून दलमला गुप्त माहिती पुरवणे व वेळोवेळी हल्ल्यांत सामील होणे असे काम करीत होता.

गुन्ह्यांचा काळा इतिहास..

शंकर महाका याने 2022 मध्ये धोडराज–इरपनार मार्गावरील रस्त्याच्या कामावरील तब्बल 19 वाहनांची जाळपोळ करण्यात सहभाग घेतला होता. ही कारवाई तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान करणारी ठरली होती. तसेच 2023 मध्ये पेनगुंडा गावातील एका निरपराध नागरिकाच्या खुनात त्याने प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचेही पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. याशिवाय त्याच्यावर इतर दोन गुन्हे दाखल आहेत.

दलममधील प्रवास..

सन 2016 ते 2021 पर्यंत त्याने जनमिलीशियामध्ये काम केले, तर 2021-22 मध्ये तो भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला. त्यानंतर त्याने जंगल परिसरात पोलिसांच्या हालचालींवर नजर ठेवून माहिती पुरविणे व नक्षल कारवायांत भाग घेणे सुरू ठेवले.

अभियानात पोलिसांचे यश..

गडचिरोली पोलिसांनी जानेवारी 2022 पासून आजपर्यंत तब्बल 109 माओवादी कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अलीकडील ही कारवाईही पोलिसांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेच द्योतक आहे. ही मोहीम विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी) संदीप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

माओवाद्यांना आत्मसमर्पणाचे आवाहन..

या कारवाईनंतर एसपी नीलोत्पल यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, पोलिसांची मोहिम आणखी तीव्र होईल आणि हिंसेचा मार्ग सोडून समाजमुखी प्रवास सुरू करण्याशिवाय माओवादी कार्यकर्त्यांसमोर पर्याय उरणार नाही. “जंगलात भटकत हिंसेचा खेळ सुरू ठेवण्यापेक्षा आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगणे हेच हिताचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

माओवादाचा पकड कमकुवत होत चालली..

गडचिरोली जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांतील पोलिस कारवायांनी माओवादी संघटनांच्या हालचालींना मोठा आळा बसला आहे. दलम सदस्यांना आता सतत पलायन करावे लागत असून मोठे हल्ले घडवून आणण्याची त्यांची क्षमता कमी होत चालली आहे. शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाचा परिणाम दिसू लागला असून, नक्षलवादाच्या उरलेल्या घटकांसाठी जंगलातील अस्तित्व टिकवणे अधिकाधिक कठीण झाले आहे.

Comments (0)
Add Comment