पाच वर्षात वैनगंगा-नळगंगा प्रकल्प पूर्ण करणार – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चुअल रॅलीत ना. जयंत पाटील यांचे आश्वासन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. १२ डिसेंबर: सेना, काँग्रेसला धक्का न लावता गावागावात पवार यांना मानणार्‍या कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्याचा, पाच वर्षात वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प पूर्णत्त्वास नेण्याचा मुबलक पाऊस पडूनही अनेक तालुके पाण्याविना असलेल्या विदर्भासह मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प जलसंवर्धन मंत्री व प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी आज दि. १२ डिसेंबर रोजी केला.

राकाँ अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ता व सामान्य जनतेशी संवाद साधणार्‍या `व्हर्च्यूअल’ रॅलीच्या निमित्ताने ते बोलत होते. स्थानिक डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल व गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार प्रकाश गजभिये, दीनानाथ पडोळे, राकाँ अल्पसंख्यंक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, ओबीसी विभागाचे ईश्वर बाळबुधे, शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्यासह विविध आघाड्या, सेलचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

ना. पाटील यांनी सांगितले की, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला राकाँचा पाठिंबा आहे. त्याकरिता कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. गावागावात आपला सुरक्षा व लवाजमा सोडून फिरल्यावर राजकारण कुणाचे संपले हे विरोधकांच्या लक्षात येईल असा टोला लगावला. राज्यभरात १३ ते २० डिसेंबर रक्तदान शिबिरे होणार असल्याची माहिती दिली.   

याप्रसंगी ना. अनिल देशमुख म्हणाले की, भारत देश खा.शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असतांना पहिल्यांदा अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला इतकेच नव्हे तर निर्यातदार देश बनला. देशात दुसरी हरितक्रांति आणण्याचे काम त्यांनीच केले. राजकारण, समाजकारण, क्रीडा, सांस्कृतिक, आपत्ती व्यवस्थापन अशा सर्वच क्षेत्रात काम करीत त्यांनी सर्वपक्षीयांशी संबंध कायम टिकविले. राजकारणात पराभव न बघणारा असा नेता विरळाच असल्यामुळेच त्यांचा देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला. विदर्भातील शेतकर्‍यांची त्यांनी सतत चिंता केली. संकट कुठलेही असू देत राज्यभरात धावून येणारा एकमेव नेता या शब्दात पवार यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा, त्यांच्यासोबतच्या प्रेरणादायी घटनांचा त्यांनी यावेळी प्रकर्षाने मागोवा घेतला. 

( हे वाचा – बोगस आदिवासींच्या नोकरी संरक्षणाला स्थगिती – पद भरतीसाठी शासनाविरोधात आफ्रोटची पुन्हा हायकोर्टात याचिका)