पत्रकारांसाठी ‘मॅरॅथॉन शुल्क` माफ करा !

वसई तालुका पत्रकार संघाची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

विरार, 24 नोव्हेंबर :- वसई-विरार मॅरॅथॉन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांना ‘मॅरॅथॉन शुल्क` माफ करण्यात यावे, अशी मागणी वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित यांनी केली आहे. या मागणीसाठी संदीप पंडित यांनी बुधवारी आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेतली. वसई-विरार ‘मॅरॅथॉन स्पर्धे`ची 10वी आवृत्ती 11 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी 9 सप्टेंबर 2022 पासून ऑनलाइन नाव नोंदणी घेण्यास पालिकेच्या वतीने सुरुवात झालेली आहे. वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेपासून पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यात ‘मॅरॅथॉन स्पर्धे`चे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेला ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय)द्वारे राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे या स्पर्धेत प्रसिद्ध धावपटूंसोबत स्थानिक प्रतिष्ठित नागरिकही सहभागी होत असतात.

हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी, महानगरपालिकेने नोंदणी शुल्कात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण पूर्ण मॅरेथॉनसाठी तसेच हाफ मॅरेथॉन आणि 11 किलोमीटरकरिता 750 रुपये, आणि 5 किलोमीटरसाठी हे शुल्क 700 रुपये इतके आहे. मात्र या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पत्रकारांना हे शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी संदीप पंडित यांनी केली आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रात काम करणारे बहुतांश पत्रकार श्रमिक वर्गात मोडणारे आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून ते वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य व राजकीय वर्तुळातील समस्यांना वाचा फोडत असतात. त्यामुळे त्यांचे योगदान लक्षात घेऊन हे शुल्क त्यांना माफ करण्यात यावे, अशी मागणी संदीप पंडित यांनी वसई तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून केली आहे.

हे देखील वाचा :-

जादूटोणा घटनांची पोलीसांत तक्रार देण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

आदिवासी विद्यार्थिनीच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

journalistsmarathon feevasaivasai virar