गडचिरोलीत हजार शाळांमध्ये भिंतीवरील पुस्तकालयांची उभारणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना वाचनसंस्कारांची भेट; ‘रत्ननिधी’ ट्रस्टचा उपक्रम...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. २७ जून : दुर्गम आदिवासी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून त्यांच्यात राष्ट्रीय भावना, जिज्ञासा आणि सर्जनशील विचारांची पेरणी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील हजार शाळांमध्ये ‘भिंतीवरील पुस्तकालय’ प्रकल्पाची सुरुवात होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या पुढाकाराने आणि ‘रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत “स्वप्नोंका पिटारा” या स्वरूपात भिंतीवर लावता येणारी आकर्षक पुस्तकालये शाळांमध्ये बसविण्यात येणार आहेत. या प्रत्येक सेटमध्ये ५० मराठी व इंग्रजी भाषेतील प्रेरणादायी व ज्ञानवर्धक पुस्तकांचा संच असेल. विज्ञान, जीवनमूल्ये, स्वातंत्र्यसैनिकांचे चरित्र, लोककथा, कल्पनारम्य कथा अशा विविध विषयांचा समावेश असून, या पुस्तकांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली आहे.

५० हजार पुस्तकांचा संच ‘रत्ननिधी’ ट्रस्टच्या CSR निधीतून मोफत पुरविला जाणार आहे. सुमारे एक लाख विद्यार्थी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात लाभार्थी ठरणार आहेत. पुढील सहा महिन्यांत या पुस्तकालयांचे जिल्ह्यातील निवडलेल्या शाळांमध्ये बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार असून, भविष्यात जिल्ह्यातील सर्व १,९९१ शाळांमध्ये हे पुस्तकालय पोहचविण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

गडचिरोलीसाठी या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि डिजिटल सुविधांपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हातात घेता येणाऱ्या पुस्तकांद्वारे कल्पनाविश्वाची दरवाजे खुली करण्याची संधी या प्रकल्पातून मिळणार आहे. वाचन संस्कृतीचा प्रसार हा शिक्षणातील मूलभूत पाया असल्याचे मानून जिल्हा प्रशासनाने या योजनेला प्राधान्य दिले आहे.

रत्ननिधी ट्रस्टचा ‘स्टोरीबुक प्रकल्प’ संपूर्ण देशात एक दशलक्ष पुस्तकांचे प्रकाशन व मोफत वितरण करतो. बालवयातील मुलांमध्ये वाचनाची आवड, बौद्धिक जिज्ञासा आणि विचारशक्ती वृद्धिंगत करण्यासाठी ट्रस्ट कार्यरत आहे. गडचिरोलीत सुरू होणाऱ्या उपक्रमामुळे शैक्षणिक क्रांतीचा नवा अध्याय लिहिला जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.