लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली :“तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा – डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा” या घोषणांनी आज गडचिरोली तालुक्यातील कोटगल गाव दुमदुमले. राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध आरोग्य उपक्रम, प्रभातफेरी, जनजागृतीपर व्याख्यानं आणि सामाजिक सहभागाने डेंग्यूविरोधातील लढा साजरा करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. कोटगल येथे प्रभातफेरीचं उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच ममता दूधबावरे व डॉ. अमित साळवे यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं. आशा कार्यकर्त्या, आरोग्य सेवक व अधिकारी यांचं मोठं प्रतिनिधित्व या फेरीत होतं.
ग्रामपंचायतीत जागृतीचा गजर..
प्रभातफेरीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात डॉ. प्रफुल गोरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य दिवाकर भोयर, उपसरपंच तेजप्रभा भोयर, विविध अधिकारी, आरोग्य अधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर डॉ. पंकज हेमके, डॉ. प्रफुल हुलके, डॉ. रूपेश पेंदाम, डॉ. बासू नरोटे, डॉ. पूजा धुळे यांचाही सहभाग होता.
डेंग्यू काय? आणि टाळायचं कसं?..
कार्यक्रमात सांगण्यात आलं की, डेंग्यू हा एडिस इजिप्ती डासांमुळे होतो. स्वच्छ साचलेल्या पाण्यात या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे नागरिकांनी घराच्या आजूबाजूला कोरडे दिवस पाळणं, पाण्याच्या टाक्या झाकून ठेवणं, कुलर, ड्रिप पॅन साफ करणं, नाल्यांची स्वच्छता करणं, गप्पी मासे सोडणं अशा उपाययोजना कराव्यात.
लक्षणे ओळखा, तातडीने उपचार घ्या..
एकाएकी ताप, डोकेदुखी, डोळ्यांमध्ये वेदना, सांधेदुखी, पुरळ, उलट्या, भूक मंदावणे, रक्तस्त्राव ही डेंग्यूची सामान्य लक्षणं आहेत. लक्षणे आढळताच सरकारी रुग्णालयात मोफत चाचणी व उपचार घ्यावेत, असं आवाहन करण्यात आलं. ‘इलायझा टेस्ट’ ही खात्रीशीर निदान चाचणी जिल्हा रुग्णालयातील सेन्टिनल सेंटरमध्ये मोफत उपलब्ध आहे.
सर्वत्र उत्साह, नागरिकांचा सहभाग…
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रभातफेरी, जनजागृती अभियान, प्रत्यक्ष स्वच्छता उपक्रम राबवून राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात आणि जनतेच्या सहभागाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेश कार्लेकर यांनी केलं तर आभारप्रदर्शन प्रकाश बारसागडे यांनी केलं.
डेंग्यूविरोधी लढ्यात प्रत्येक नागरिक ‘योद्धा’ ठरावा!..
“डेंग्यू रोखण्यासाठी प्रशासनाचं प्रयत्न पुरेसं नाही, प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी आणि गाव-शहर डासमुक्त करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं,” असं आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आलं.