सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचा प्रयत्न राहील – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

  • गृहविभागाबद्दल सामान्य नागरिक आणि महिलांना न्यायाची मोठी अपेक्षा.
  • माध्यमांना माहिती देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा विचार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ६ एप्रिल – गृहविभागाकडून सामान्य नागरिक व महिला यांना मोठ्या अपेक्षा असतात. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पोलिस दलाबद्दल विश्वास वाटला पाहिजे यादृष्टीकोनातून सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचा प्रयत्न राहील असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

नूतन गृहमंत्री म्हणून दिलीप वळसेपाटील यांनी आज मंत्रालयात कार्यभार स्वीकारला. 

यावेळी दिलीप वळसेपाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर सर्वांना धन्यवाद दिले. विश्वासाने ही जबाबदारी टाकली आहे ती जबाबदारी पुढच्या काळात पार पाडायची आहे. मात्र हे काम अवघड आणि चॅलेंजिंग आहे असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

कोरोनामुळे सर्व पोलिस फौजफाटा रस्त्यावर, फिल्डवर कार्यरत आहे. पोलिस दलाचं काम कायदा व सुव्यवस्था राखणं आहेच परंतु या कोरोना काळात जी काही बंधनं राज्य सरकारने घातली आहेत त्याची अंमलबजावणी करणं व यशस्वीपणाने करणं हीपण जबाबदारी पोलिस विभागावर आहे. याच महिन्यात गुढीपाडवा, रमजान महिना सुरू होतोय, आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती हे सगळे दिवस महत्त्वाचे आहेत. कोरोना अंदाज घेतला किंवा तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या महिन्यात आणखी चॅलेंजिंग परिस्थिती असणार आहे असेही दिलीप वळसेपाटील यांनी सांगितले.

सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचा प्रयत्न राहणार आहेच शिवाय यासाठी आवश्यक त्या आजी- माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी व अन्य अधिकार्‍यांचा सल्लासुध्दा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पोलिस दलाचे सक्षमीकरण करणं ही एक महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीकोनातून पावलं टाकणार आहे. स्वच्छ प्रशासन आणि प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप राहणार नाही अशी स्पष्ट भूमिका दिलीप वळसेपाटील यांनी मांडली.

पोलिस बदल्यांसंदर्भात जी काही प्रत्येक विभागात सिस्टीम ठरलेली आहे. वेगवेगळयास्तरावर अधिकार दिलेले असतात त्याप्रमाणे निर्णय करण्यात येईल असेही दिलीप वळसेपाटील यांनी सांगितले.

प्रस्तावित शक्ती कायदा, पोलिस भरती गतीमान करणे, पोलिस हाऊसिंगमध्ये घरे बांधणे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हेही दिलीप वळसेपाटील यांनी सांगितले.

यापुढील काळात धोरणात्मक बाबी असतील त्यासंदर्भात प्रश्न मला विचारले जावेत. कारण दैनंदिन दिवसात छोट्यामोठ्या चौकशांबाबत जे प्रश्न विचारले जातात किंवा त्यासाठी संपर्क केला जातो त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचं काम मनात असून ती स्वतंत्र यंत्रणा आपल्याला जी माहिती मिळायला हवी ती आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल अशी विनंती गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी माध्यमांना केली.

काल उच्च न्यायालयाने निर्णय दिला त्या निर्णयामध्ये जी काही प्राथमिक चौकशी सुरू आहे. त्यामध्ये राज्यसरकार संपूर्ण सहकार्य NIA, CBI या यंत्रणांना करेल असे सांगतानाच कालच्या उच्च न्यायालयाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात राज्यसरकारच्यावतीने आव्हान देणार आहे. त्याबाबतचा राज्यसरकारने निर्णय घेतला असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान माध्यमांचे येत्या काळात सहकार्य हवे असे आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी काही प्रश्न गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केले. त्यावेळी गृहविभाग हा नेहमीच चॅलेंजिंग राहिला आहे. किंवा काटेरी मुकुट म्हणता येईल असाच हा विभाग राहिला आहे. कारण दैनंदिन घटना घडत असतात त्यामधून नवनवीन प्रश्न तयार होतात आणि त्याची सोडवणूक करावी लागते असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. दरम्यान अत्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

Dilip Walse Patil