लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील मद्देड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धनगोल या दुर्गम आदिवासी गावातून पुन्हा एकदा नक्षल हिंसेची निर्दयी छाया डोकावली आहे. अंगमपल्ली ग्रामपंचायतीच्या आश्रित असलेल्या या गावाजवळ १३ जुलैच्या संध्याकाळी साडेचारच्या सुमारास जंगलात गेलेल्या तिघा निष्पाप ग्रामस्थांना नक्षलांनी पुरवून ठेवलेल्या आयईडी स्फोटाचा थरारकारक फटका बसला. पुटू (जंगली अन्नधान्य) संकलनासाठी गेलेल्या या तिघांवर मृत्यूचा सापळा अचानक कोसळला आणि त्यांच्या आयुष्यावर आघात करत जंगलाच्या शांततेला हिंसेच्या आर्त किंकाळीत बदललं.
या भीषण स्फोटात कोरसे संतोष (२४, वडील लक्ष्मय्या), चिंडेम कन्हैया (२६, वडील किस्टय्या) आणि कुडेम कविता (१७, वडील नगय्या) हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने बीजापूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. स्फोटाचा आवाज परिसरात घुमताच गावात भीती आणि गोंधळाचं वातावरण पसरलं. घटनास्थळी तात्काळ प्रशासन व पोलिसांनी धाव घेतली असून परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.
ही घटना केवळ एका हिंसक कृतीपुरती मर्यादित नाही, तर ती नक्षलवादाच्या अस्तित्वाचा आणि प्रशासनाच्या अपयशाचा पुन्हा एकदा ठळक दाखला ठरते. जंगलात राहणाऱ्या आदिवासींसाठी पुटू संकलन हे उपजीविकेचं साधन असून त्यावरही आता मृत्यूचं सावट निर्माण झालं आहे. नक्षल हिंसेच्या या सलग घटनांनी केवळ शरीरावर नव्हे, तर संपूर्ण आदिवासी समाजाच्या मानसिकतेवर खोल जखमा केल्या आहेत.
या घटनेने जंगल क्षेत्र पुन्हा एकदा बंदुकीच्या बारांशिवायही थरारले असून सरकार व प्रशासनासमोर पुन्हा एकदा प्रश्न उभा ठाकला आहे – हे दुर्गम आदिवासी सुरक्षित कधी होणार? नेहमीप्रमाणे उशिरा पोहोचणारी यंत्रणा, सशस्त्र कारवाईनंतर विस्मरणात जाणारे निष्पाप बळी आणि पुढे ढकललेली पुनर्वसन व्यवस्था – ही चक्रव्यूहासारखी यंत्रणा आता मोडण्याची वेळ आली आहे. जंगलात नक्षलांनी लपवलेल्या स्फोटकांपेक्षा या भागात सरकारची अनुपस्थिती अधिक धोकादायक बनली आहे.