निवडणुकीच्या तोंडावरच औरंगाबाद नामांतराचा विषय का?; भाजप-शिवसेनेला राज ठाकरेंचा सवाल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, ६ फेब्रुवारी: राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय चर्चेत आहे. भाजप आणि मनसेनं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच राज्यात सध्या महाविकासआघीडीचं सरकार आहे. परंतु, औरंगाबादचं नामांतरण करण्याच्या प्रस्तावासंदर्भात महाविकासआघाडीत बिघाडीचं चित्र दिसत आहे. राज्यात शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र औरंगाबादच्या नामांतराला विरोध दर्शवला आहे. अशातच औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे.

औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांवर टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही औरंगाबादचं नामांतर का झालं नाही? असा सवालही यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेला केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “भाजप असो किंवा शिवसेना असो. ज्यावेळी केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्ता होती, तेव्हा नांमांतरण का नाही झालं? आज कसलं राजकारण करताय तुम्ही? इतर अनेक शहरांची नावं बदलली गेली. दिल्लीत तर रस्त्यांची नावं बदलली गेली. मग केंद्रात आणि राज्यात जेव्हा तुमचं सरकार होतं, त्यावेळी औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं? याचं उत्तर भाजपनंही द्यावं आणि शिवसेनेनंही द्यावं. लोकांना काय वेडे समजलात का? बरोबर निवडणुकांच्या तोंडावर संभाजीनगरचा विषय आणायचा, केला का नाही तुम्ही इतकी वर्ष? थांबवणारं कुणीच नव्हतं. केंद्रात व राज्यातही तुम्हीच होता. तेव्हा हे विषय येत नाहीत. मग आताच कुठून आला? ते पण निवडणुका लागल्या लागल्या. मला असं वाटतं संभाजीनगरची जनता हुशार आहे. ते त्यांचा निर्णय योग्य घेतील आणि या लोकांचा योग्य समाचार देखील घेतील.”

Raj Thakarey