गणेशोत्सवात आरोग्य विभागाकडुन आरोग्य विषयक व्यापक जनजागृती

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया चा प्रदुभाव लक्षात घेता मलेरिया विषयी व्यापक जनजागृती होणेसाठी आरोग्य विभाग विविध उपक्रम राबवत आहे. सध्या जिल्हयात गणेशोत्सव मोठया आनंदाने साजरा होत आहे.यामध्ये आरोग्य विभाग व हिवताप विभाग इतर विभागाच्या समन्वयाने व्यापक जनजागृती होणेच्या दृष्टिने सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी हिवताप व आरोग्य कार्यक्रमाचे पोस्टर, बॅनर लावुन कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवुन जनतेचा सहभाग घेवुन जनजागृती करत आहे. तसेच वैद्यकिय अधिकारी,आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका प्रत्येक गणेशोत्सव मंडळांना भेट देवुन किटकजन्य व जलजन्य आजाराबाबत जनजागृती करणेकरीता आवाहन करत आहेत.

मंडळातील कार्यकर्त्यांना सोबत घेवुन किटकजन्य आजारापासुन स्वत:चे व इतरांचे संरक्षण कसे करायचे मार्गदर्शन गावातील लोकांना त्यांच्या स्थानिक भाषेत सांगितले जात आहे.मच्छरदाणीचा वापर करणे,साठुन राहणा-या पाण्यात गप्पी मासे सोडणे,कोरडा दिवस पाळणे याबाबत मार्गदर्शन केले जात तसेच गप्पी मासे प्रदर्शनी, डास अळी प्रदर्शनी भरवली जात आहे.तसेच क्षयरोग, कुष्ठरोग,सिकलसेल या बाबत माहीती दिली जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले.

गोदरेज सी.एस.आर. च्या माध्यमातून फॅमिली हेल्थ इंडिया च्या वतीने तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, व आरोग्य विभाग गडचिरोली च्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, एटापल्ली, व धानोरा या तालुक्यात Elimination of Mosquito Borne Endemic Disease (EMBED) स्थानिक डासजन्य रोग निर्मूलन प्रकल्प राबविल्या जात आहे.तसेच जिल्हयात किटकनाशक फवारणी ची पहिली फेरी 658 गावात पुर्ण झाली असुन किटकनाशक फवारणी ची लवकरच दुसरी फेरी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ पंकज हेमके यांनी सांगितले.
जिल्हयात एकूण पर्जन्यमान पाहता पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.पुरपरिस्थीती मध्ये व पुर ओसरलेनंतर जलजन्य व किटकजन्य आजारांचा धोका असतो ,साथरोग परिस्थिती उद्भवु नये यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.

किटकजन्य आजरबाबत घ्यावयाची काळजी
* ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या घरगुती औषधोचार करु नका.* मच्छरदाणीचा वापर करा.
*दर आठवड्याला घरातील पाण्याची भांडी मोकळी करा व आतून स्वच्छ घासून पुसून घ्या.
* रिकाम्या न करता येणाऱ्या भांड्यामध्ये दर आठवड्याला आरोग्य कर्माचारी मार्फत अळीनाशक द्रावण (टेमीफॉस) टाका.
* घरावरील तसेच घरातील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावा.
* जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या, पाणी साचू शकेल अशा फुटलेल्या बाटल्या, प्लास्टिकच्या वस्तू अशा निरुपयोगी वस्तू घराभोवती साठू देऊ नका.
* घरातील फुलदाण्या, कुलर्स, फ्रिज यांमध्ये साचलेले पाणी दर दोन-तीन दिवसांनी काढा.
नागरिकांनी जलजन्य आजाराबाबत काळजी घ्यावी
* शिळे आणि उघड्यावरील अन्न खाऊ नका
* घरात आणि घराभोवती माशा होऊ नयेत यासाठी स्वच्छता ठेवा.
* साथीच्या काळात पिण्याचे पाणी उकळून गार करून प्या.
* लहान मुले आणि गरोदर माता यांना पिण्याचे पाणी उकळून गार केलेले द्या.
* पिण्याच्या पाण्याबाबत योग्य काळजी घ्या.
* आपल्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण नियमित होते आहे ना याबाबत खातरजमा करा.
* ज्या ठिकाणी स्वच्छता पाळली जात नाही अशा हॉटेल किंवा इतर ठिकाणी खाणे, पाणी पिणे टाळा. बाहेरील बर्फ खाणे टाळा.
* घराबाहेर पडताना प्रवासात आपल्या सोबत पाणी ठेवा, जेणे करून कुठलेही पाणी पिण्याची वेळ येणार नाही.

Comments (0)
Add Comment