रानडुकरांचा हैदोस! कोरचीतील तेंडूपत्ता संकलक महिलांवर जीवघेणे हल्ले; तीन महिला जखमी, दोन गडचिरोलीत उपचाराधीन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : कोरची तालुक्यातील दुर्गम भागात वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे जनजीवन पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. बेतकाठी व बिहीटेकला गावांच्या जंगल परिसरात तेंडूपत्ता संकलनासाठी गेलेल्या तीन महिलांवर रानडुकरांनी जीवघेणे हल्ले करून त्या गंभीर जखमी केल्याच्या घटना दोन दिवसांत उघडकीस आल्या आहेत. यात दोन महिलांवर आज तर एकावर काल रानडुकरांनी हल्ला केला असून त्यांच्यावर सध्या गडचिरोली व कोरची येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

रानात गाठ आणि जीवघेणा हल्ला…

गुरुवारी (८ मे) सकाळी बेतकाठी येथील काही महिला नेहमीप्रमाणे तेंडूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. याचवेळी दबा धरून बसलेल्या एका रानडुकराने निराशा रवींद्र गुरवले (वय ३०) या महिलेवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात तिच्या दोन्ही पायांना आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी तिला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

कालच्याच दिवशी आणखी दोन हल्ले..

या घटनेच्या एक दिवस आधी, ७ मे रोजी बेतकाठी गावातीलच नंदकुमारी तेजराम बघवा (वय ४०) हिच्यावरसुद्धा रानडुकराने हल्ला केला. सुदैवाने तिच्यासोबत असलेला कुत्रा जोरजोराने भुंकू लागल्याने रानडुकराने तिला इजा करण्याआधीच पळ काढला. तिला किरकोळ दुखापत झाली असून सध्या ती कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे.

त्यानंतर काही वेळातच बिहीटेकला येथील उर्मिला संतोष मिरी (वय ४०) या महिलेवरही असाच हल्ला झाला. उर्मिला यांच्यावर डुकराने आक्रमकतेने हल्ला करून तिला अनेक खोल जखमा केल्या आहेत. तिची प्रकृती गंभीर असून तिला तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

जंगलात काम, पण जीव मुठीत..

या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. उन्हाळा सुरू झाला की आदिवासी महिलांची पावलं तेंडूपत्ता संकलनासाठी जंगलाच्या दिशेने वळतात. मात्र यावेळी त्यांना सामोरे जावे लागते ते वन्यजीवांच्या वाढत्या वावराला. पोटासाठी जंगलात जंगलात जाणाऱ्या मजुरांना आता आपला जीव गमावण्याची वेळ येत आहे, ही वस्तुस्थिती अधिक गंभीर आहे.

वनविभागाची हालचाल, पण प्रश्न अनुत्तरितच..

घटनेची माहिती मिळाल्यानंतर बेळगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी महिलांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या. तेंडूपत्ता संकलनात मजुरांच्या सुरक्षेसाठी पूर्वी झालेल्या करारानुसार, मजूर मृत झाल्यास दीड लाख रुपये, तर जखमी झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंतचा औषधोपचार खर्च देण्यात येतो. जखमींच्या नातेवाईकांनी तत्काळ मदत आणि सुरक्षाव्यवस्था पुरविण्याची मागणी केली आहे.

शासन आणि ठेकेदारांचा जबाबदारीचा प्रश्न..

या तिन्ही घटनांनी शासन, वनविभाग आणि तेंडूपत्ता ठेकेदार यांच्यासमोरील जबाबदारी अधोरेखित केली आहे. मजुरांना जंगलात पाठवताना त्यांचं जीवित सुरक्षीत ठेवणं ही प्राथमिक गरज असतानाही, अद्याप त्या दिशेने पुरेशी पावलं उचलली गेलेली नाहीत, हे या घटनांतून स्पष्ट होतं.