दारू पिणे सोडून, बांधले छोटे सुंदर घर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 5 ऑगस्ट 2023 : मुक्तिपथ कार्यकर्त्यांकडून व्यसन उपचार क्लिनिकची मला माहिती मिळाली. शुक्रवारी आलापल्ली येथील उपचार क्लिनिक मध्ये पत्नीला सोबत घेऊन मी गेलो. दारूमुळे बरेच नुकसान झाल्यावर माझ्या लक्षात यायला लागले होते की, जर आता दारू पिणे बंद केले नाही तर तब्बेत दिवसेंदिवस खराब होत जाईल. 

 वयाच्या १२ व्या वर्षी पासून मी दारू पिणे सुरू केले. मित्रांच्या संगतीत पिण्याची सवय लागली आणि ४२ वयाचा झालो तरी दारू पिणे सुरूच होते. दिवसभर ड्रायव्हिंगचे काम करत असल्याने कामाचा थकवा खूप यायचा. दारू सोडायचा कधी विचार केला नाही पण गेल्या ३ वर्षापासून पिण्याचे प्रमाण इतके वाढले की, मी भेटेल ती दारू प्यायला लागलो. गुळाची, मोहाची, बियर, ताडी अशी सर्वच दारू प्यायला लागलो. पिण्याचे प्रमाण अतिशय वाढल्याने २०१८ साली मला लिव्हवर सूज, उलटीतून रक्त पडणे व कावीळ हे गंभीर आजार झाले. उपचारासाठी मला  दवाखान्यात भर्ती व्हावे लागले. सोबतच इतर बरेच शारीरिक त्रास होत होते. झोप न लागणे, हातापायला थरथरी येणे, जेवण खुपच कमी झाले होते. दारूच्या नशेत गाडी चालवल्याने एकदा अपघात झाला. दिवसभर दारूच्या नशेत राहत असल्याने कामावर लक्ष लागत नव्हते. बरेच नातेवाईक, कुटुंबीय, दारू सोडून दे, असे सांगायचे. माझी इच्छा व्हायची पण सोडतांना होणाऱ्या त्रासांपुढे मी हतबल झालो होतो.
       म्हणूनच मुक्तिपथ व्यसनउपचार क्लिनिक मध्ये गेलो. तिथे माझ्या सर्व समस्या समजून घेतल्या. माझा आजार गंभीर असल्याने, समुपदेशकाने मला सर्च दवाखान्यात रेफर केले. तिथल्या मानसोपचार तज्ञ डॉ. आरती बंग मॅडम, यांनी  मला उपचार दिला. सर्च मधील उपचारसोबतकच तालुका क्लिनिक मध्ये जाऊन नियमीत उपचारही मी घेत होतो. हळूहळू माझ्या तब्बेतीत सुधारणा दिसू लागली.
वेळोवेळी समुपदेशकाच्या मिळालेल्या सल्ल्यातून, माझ्या वर्तनात देखील बदल होत गेले. सुरूवातीला दारू पिण्याचे प्रमाण कमी करण्यात मला यश आले. त्यांनंतर काही दिवसातच दारू पिणे मी पूर्ण बंद करू शकलो. दारू पिणे बंद केल्यावर माझ्या घरचे खुपच खुश व आनंदात होते. मी जिथे काम करत होतो, तेथील लोक पण मला म्हणत होते “ दारू सोडल्यावर सतीश तू चांगला दिसून राहला”. ते ऐकून मला ही फार बरं वाटत होतं.
       २०१९ पासून क्लिनिकचा पूर्ण उपचार घेतल्याने, आज माझे दारू पिणे पूर्ण बंद आहे. दारू मुळे माझे, पैशाचे जे नुकसान झाले होते, ते दारू सोडल्याने बचत करू शकलो. आज माझ्या परिवारसाठी मी ५ लाखाचे छोटेसे व सुंदर असे घर बांधू शकलो. दारू सोडली नसती तर हे कधीच शक्य झाले नसते.
हे पण वाचा :-
https://youtu.be/0W5cwagvLOw
https://youtu.be/eYC4zWxQe7w