जेप्रा-दिभना जंगल परिसरातील घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २७ मार्च: मोहफुल वेचण्याकरीता गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना आज २७ मार्च रोजी दिभना जंगल परिसरातील एफडीसीएमच्या कक्ष क्रमांक २ मध्ये सकाळच्या सुमारास निदर्शनास आली. शोभा नामदेव मेश्राम (५०) रा. राजगाटा माल असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार शोमा मेश्राम ही काल २६ मार्च रोजी जेप्रा लगतच्या जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी गेली होती. मात्र ती घरी परत आली नाही. काल तिचा शोच घेतला असता ती दिसुन आली नाही. आज सकाळच्या सुमारास पुन्हा शोध मोहीम राबविली असता तिला वाघाने ठार केले असल्याचे निदर्शनास आले. वाघाने तिला ठार केल्यानंतर जवळपास एक ते दिड किलोमीटर ओढत नेल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविकास महामंडळाच्या वरीष्ठ अधिका-यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सद्या मोहफुले वेचण्याचा हंगाम असल्याने ग्रामीण भागातील नागरीक पहाटेच मोहफुले वेचण्यासाठी जातात. मात्र वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे त्यांना आपला जिव गमवावा लागत आहे. त्यामुळे नागरीकात भिती निर्माण झाली आहे.