लोकस्पर्श न्युज नेटवर्
मुंबई, ३ मार्च:- एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने मेट्रोमधील महिला कर्मचऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने मुंबई मेट्रो मधील स्थानकांचे कार्यान्वयन आणि व्यवस्थापन महिलां मार्फत करण्याचा निर्णय घेऊन इतिहास घडवला आहे. स्टेशन व्यवस्थापकापासून सुरक्षा रक्षक कर्मचार्यांपर्यंत ७६ महिला कर्मचाऱ्यांमार्फत मेट्रो मार्ग २अ वरील आकुर्ली आणि मेट्रो मार्ग ७ वरील एक्सर या मेट्रो स्थानकांचे कार्यान्वयन आणि व्यवस्थापन केले जात आहे. परिवहन क्षेत्रातील महिलांचे योगदान अधोरेखित करून कामाच्या ठिकाणी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
आकुर्ली आणि एक्सर या स्थानकांवरील सर्व-महिला कर्मचारी हे ३ शिफ्टमध्ये कार्यरत असणार आहेत, ज्यामध्ये स्टेशन कंट्रोलर, ओव्हर एक्साइज आणि तिकीट विक्री अधिकारी, शिफ्ट पर्यवेक्षक, ग्राहक सेवा अधिकारी इ. अधिकारी मेट्रो प्रवाशांना मदत करतील, तर सुरक्षा आणि सफाई कर्मचारी मेट्रो स्थानकांवरील सुरक्षितता आणि स्वच्छ वातावरण सुनिश्चित करतील. हा उपक्रम केवळ परिवहन उद्योगातील महिलांच्या क्षमता अधोरेखित करणारा नसून इतर महिलांना या क्षेत्रात करीयर करण्यासाठी प्रेरीत करणारा ठरेल.
मेट्रोमधील महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासोबत त्यांच्यासाठी स्वतंत्र कपडे बदलण्याची व्यवस्थादेखील केली आहे. तसेच महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र मेट्रोचे डबे, स्वतंत्र प्रसाधन गृह, आणि 1800 889 0808 हा टोल फ्री मदत क्रमांक पुरविण्यात आला आहे.
मेट्रोच्या कार्यान्वयनासाठी सुमारे २७% म्हणजे ९५८ महिला कर्माऱ्यांचा समावेश असून ते देखभाल आणि दुरुस्ती, एचआर, वित्त आणि प्रशासन या विभागात कार्यरत आहेत. ज्यामधील बरेचसे कर्मचारी हे बाह्यासेवेमार्फत घेण्यात आले आहेत. महा मुंबई मेट्रो एक कार्यक्षेत्र तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे जिथे सर्व कर्मचाऱ्यांना आधार वाटेल. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी समान संधी मिळण्याची खात्री करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने हा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा :-