लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,२४ जून: चामोर्शी तालुक्यातील कोनसरी गावातील १९ महिलांनी वाहनचालक बनण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत आत्मनिर्भरतेकडे निर्णायक वाटचाल सुरू केली आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या प्रायोजकत्वात या महिलांना छिंदवाडा (म. प्र.) येथील अशोक लेलँडच्या प्रशिक्षण केंद्रात ४५ दिवसांचं निवासी हलक्या वाहन चालविण्याचं प्रशिक्षण मिळणार आहे.
या स्तुत्य उपक्रमाला रवाना करताना कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, एलएमईएल व एलआयसीएलचे वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी महिला आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून बसचा निरोप देण्यात आला.
महिलांना ‘चालक’ बनवणाऱ्या या उपक्रमामागे लोकसहभाग आणि CSR यशस्वी समन्वय…
ग्रामपंचायत कोनसरी व एलएमईएल यांचा हा संयुक्त उपक्रम गावातील महिलांना केवळ वाहन चालवायला शिकवणार नाही, तर त्यांना उपजीविकेच्या स्वयंपूर्ण वाटेवरही नेईल, असा विश्वास सरपंच पावडे यांनी यावेळी व्यक्त केला.
“गावातील महिलांसाठी हे केवळ प्रशिक्षण नसून, आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाचा आरंभ आहे,” असे मत व्यक्त करत त्यांनी एलएमईएलचा आभार मानला.
एलएमईएलचे मानव संसाधन अधिकारी यांनी स्पष्ट केलं की, “आमच्या व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांचा विशेष भर स्थानिकांच्या कौशल्य विकासावर आहे. एलएमईएल नेहमीच आपल्या CSR योजनांतून आदिवासी व ग्रामीण समाजाच्या विकासात हातभार लावत आहे.”
यावेळी कोनसरी येथील लॉयड्स कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रात महिलांचा औपचारिक सत्कार करण्यात आला.
‘ड्रायव्हर’ नव्हे, दिशा बदलणाऱ्या महिला!..
एलएमईएलच्या या प्रयत्नामुळे गावांतील पारंपरिक भूमिका मोडून महिलांना वाहनचालक म्हणून स्वतंत्र ओळख मिळवून देणारा सामाजिक बदल घडवला जात आहे. ही नुसती कौशल्यविकासाची योजना नाही, तर ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्याला नवीन वळण देणारी आशादायक सुरूवात आहे.
आयटीआय विद्यार्थ्यांसाठी ऑन-जॉब प्रशिक्षणाची पहिली तुकडी सुरु…
दरम्यान, चामोर्शी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील २० विद्यार्थ्यांची पहिली तुकडीही कोनसरीतील लॉयड्स प्रशिक्षण केंद्रात ऑन-जॉब प्रशिक्षणासाठी दाखल झाली आहे. या विद्यार्थ्यांना ५ जुलै रोजी एलएमईएलकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील निवड १ सप्टेंबरपासून होणार असून, गडचिरोली जिल्ह्यातील ३५ आयटीआय संस्थांना पत्रव्यवहार करून विद्यार्थ्यांना या संधीसाठी प्रवृत्त केलं जात आहे.
एलआयसीएल व एलएमईएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, प्रत्यक्ष कार्यानुभवानेच रोजगारक्षमतेत वाढ होते, हे स्पष्ट केलं.