गडचिरोली जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शासकिय/खाजगी कार्यालयात 50% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत होणार कामकाज

  • जिल्हा प्रशासनाकडून नवीन नियमावली लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, 16 मार्च : महाराष्ट्र राज्यात सध्यास्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत शासनाकडून निर्देश दिले गेले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हयात दीपक सिंगला, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शासकिय/खाजगी कार्यालयात 50% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू ठेवणे बाबत निर्देश दिले आहेत. तसेच जास्तीत जास्त आस्थापनांनी वर्क फ्रॉम होम नुसार कामाला प्राधान्य द्यावे असे निर्देश देणेत आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये प्राप्त झालेला अधिकाराचा वापर करुन दिनांक 15 मार्च  पासून ते 31 मार्च, 2021 पर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश लागु करण्यात येत आहे. शासन निर्देशाप्रमाणे कोविड-19 साथरोग अंतर्गत गडचिरोली क्षेत्राबाबत नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे.

प्रातिबंधित बाबी:- सर्व सिनेमागृहे (सिंगल स्क्रीन/मल्टीप्लेक्स/हॉटेल्स/उपहारगृहे/ शॉपिंगमॉल रेस्टॉरन्ट 50% क्षमतेत चालू राहतील, मास्क घातल्याशिवाय कोणत्याही व्यक्ती/इसमास प्रवेश नसणार आहे, प्रत्येक ग्राहकाचे, इसमाचे तापमान मोजण्यात येणार, तापमाण 100.6 फॅरेनट किंवा 98.6 सेल्सशिअस पेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीस प्रवेश नसेल, हॅन्ड सॅनिटायझर प्रवेशद्वारावर व उचित  ठिकाणी उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. संबधित आस्थापनानी मास्क व सुरक्षित अंतर याचे पालन व्हावे म्हणून आवश्यक कर्मचारी वर्ग नेमावेत. सर्व सामाजिक / धार्मिक/राजकीय/संस्कृतीक कार्यक्रमांना बंदी घालण्यात येत आहे, लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी राहणार नाही, अंत्यविधीकरीता जास्तीत जास्त 20 लोकांना परवानगी राहील.

गृहविलगीकरणात खालील बंधने राहतील :- कोवीड-सकारात्मक गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तीने आपली माहिती स्थानिक प्रशासनाला दयावी, सार्वजनिक आरोग्य विभागा कडून 14 दिवस गृहभेट दिली जाणार आहे, गृहविलगीकरणाचा स्टीकर संबधित कोवीड सकारात्मक रुग्णाच्या घरी चिकटवला जाणार, संबधित व्यक्तींच्या घरातील लोकांच्या हालचालीवर निर्बंध राहतील, वरिल बाबीचे उल्लंघन केल्यास संबधितांना कोवीड केअर सेंटरला हलविण्यात येणार आहे.

सर्व धार्मिक संस्थांना किती भाविकांना एका तासात धार्मिकस्थळांना भेट देता येईल याची आकडेवारी जाहीर करुन उचित खबदारी घेणे बाबत सूचना करण्यात आल्या आहेत.     

सदरील आदेशाचे पालन न करणारी/उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून जाहिर करण्यात आले आहे.

Collector Dipak Singla