लाॅरेन्स बिश्नोई गॅंगच्या धमकीनंतर सलमानला Y+ दर्जाची सुरक्षा

अक्षय कुमार, अनुपम खेर यांनाही पोलीस संरक्षण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  01 नोव्हेंबर :-  पंजाबी गायक सिध्दू मूसेवालाच्या हत्येमागे असलेल्या लाॅरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानच्या जीवाला धोका असल्याच्या कारणास्तव महाराष्ट्र सरकार ने सलमानच्या सुरक्षेत वाढ करून त्याला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे.

सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जून मध्ये धमकीचे पत्र मिळाले होते. सलीम खान यांच्या सुरक्षारक्षकांनी ते पत्र पाहिले. तुझाही मूसेवाला करू, अशी धमकी त्यात सलमान आणि सलीम खान यांना देण्यात आली होती. सिध्दू मूसेवालाची पंजाबमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याचाच संदर्भ या धमकीपत्रात देण्यात आला होता. या पत्रानंतर मुंबई पोलिसांनी लाॅरेन्स बिश्नोई गॅंगच्या काही गुंडांना अटक केली. त्यापैकी काहींनी सलमानला लक्ष्य केल्याची कबूली दिली असल्यामुळे सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आता त्याच्या सोबत चार सशस्त्र कर्मचारी असतील. अक्षय कुमारला एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. एक्स दर्जाच्या सुरक्षेत तीन सुरक्षा अधिकारी शिफ्टमध्ये काम करतात. अनुपम खेर यांनाही त्याच दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या सुरक्षेचा खर्च सेलिब्रिटीच उचलणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई, पंजाब आणि दिल्लीत केलेल्या तपासात हे उघड झाले होते की लाॅरेन्स बिश्नोई आणि ब्रारच्या गुंडांनी सलमानला मुंबईत जीवे मारण्याचा प्लॅन केला होता. या गुंडांनी 2017 मध्ये त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या वेळी वांद्रे इथल्या घराबाहेर आणि 2018 मध्ये पनवले फार्महाउस जवळ त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. द काश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर धमक्या मिळाल्याने अनुपम खेर यांना सुरक्षा देण्यात आली आहे तर अक्षय कुमारला त्याच्या राष्ट्रीयत्वावरून सोशल मिडिया वर ज्या धमक्या मिळाल्या, त्यामुळे सुरक्षा देण्यात आली आहे.

हे पण वाचा :-

for SalmanY+ security