लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, 15 ऑगस्ट — गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना कठोर कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतर, आष्टी पोलिसांनी तब्बल 78 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत सोने, रोकड, मोबाईल फोन आणि दोनचाकी वाहन हस्तगत करण्यात आले आहे.
ही घटना 27 जुलै रोजी मौजा येनापूर येथे घडली. येथील रहिवासी मायाबाई माधव अलचेट्टीवार सकाळी घराला कुलूप लावून शेतीकामासाठी गेल्या असताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून 15 हजार रुपयांची रोकड आणि 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लंपास केली. त्यानंतर, शेजारी राहणाऱ्या विस्तारी नागन्ना मेकर्तीवार यांच्या घराचे कुलूप तोडून 10 हजार रुपयांची रोकड व 13 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 78 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात कलम 331(3), 305(अ) भान्यासं अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
चोरट्याने घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा न सोडल्याने तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरला. मात्र, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस पथकांनी शिताफीने आरोपीचा माग काढत निकेश देविदास मेश्राम (28, रा. लखमापूर बोरी, ता. चामोर्शी, ह.मु. वंजारी मोहल्ला, गडचिरोली) याला 12 ऑगस्ट रोजी अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची पोत, 25 हजार रुपयांची रोकड, दोन मोबाईल फोन आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
आरोपीस न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास गोकुलदास मेश्राम हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे आष्टीचे प्रभारी अधिकारी विशाल काळे, गोकुलदास मेश्राम, रतन रॉय, भाऊराव वनकर, रविंद्र मेदाळे, संतोष श्रिमनवार यांनी केली.