लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २१ जून :“योगामुळे केवळ शरीर नव्हे, तर मनही स्थिर व शांत होते. सोशल मीडियाचा अतिरेक आणि धकाधकीच्या जीवनशैलीतून येणाऱ्या तणावावर मात करण्यासाठी योग अत्यंत प्रभावी उपाय आहे. मात्र योगाचा खरा लाभ हवा असेल, तर तो केवळ एक दिवस नव्हे, तर दैनंदिन जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केले.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात योगासने आणि प्राणायामांचे सजीव प्रात्यक्षिक घेण्यात आले. योग प्रशिक्षक अंजली कुळमेथे आणि मिलिंद उमरे यांच्या मार्गदर्शनात नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या वेळी खासदार नामदेव किरसान यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “योगामुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि मनाची एकाग्रता वाढते. ही केवळ आरोग्यवर्धक प्रक्रिया नसून, दीर्घायुष्य व समाधानासाठी आवश्यक जीवनपद्धती आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे होते. यावेळी प्र-कुलगुरु श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
विद्यापीठाबरोबरच जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वतंत्र योग सत्र घेण्यात आले. आरमोरी येथे आमदार रामदास मसराम व माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. एटापल्ली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी नमन गोयल यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहेरी, वडसा, कुरखेडा, कोरची आणि अन्य तालुक्यांतील शाळा, संस्था, मंडळांमध्येही योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
विद्यापीठात आयोजित मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सविता साधमवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस.बी. बडकेलवार, घनश्याम वरारकर, चंद्रशेखर मेश्राम, नाजुक उईके, कुणाल मानकर, सुनील चंद्रे आदींचे विशेष योगदान लाभले.
जिल्हाभरातून नागरिक, विद्यार्थी, खेळाडू व योगप्रेमींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत योग दिन साजरा केला. संपूर्ण जिल्ह्यातून ‘योग हा आरोग्याचा आधार’ या संकल्पनेवर आधारित हा जनजागृती उपक्रम सकारात्मक प्रतिसादात पार पडला.