‘आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल 2.0 च्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी वेळेत निकाली काढा -जिल्हाधिकारी संजय दैने

अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाले प्रशिक्षण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: नागरीकांना त्यांच्या तक्रारी घेऊन शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये. त्यांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा व्हावा, या उद्देशाने शासनाने ‘आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल 2.0’ उपलब्ध करून दिले आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पोर्टलच्या तांत्रिक बाबींची व हाताळणीचे परिपूर्ण प्रशिक्षण घेवून नागरीकांच्या तक्रारी वेळेत निकाली काढण्याच्या सुचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या.
‘आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल 2.0’या पोर्टलचे महत्व, उद्देश, गांभीर्य, शासकीय विभागाची जबाबदारी आदी बाबी अवगत होण्यासाठी मुंबई येथून आलेल्या चमून जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या प्रशिक्षण सत्राला मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, पोलीस अधिक्षक श्री. निलोत्पल, अतिरीक्त जिल्हाधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी भुसंपादन (सामान्य) प्रसेनजित प्रधान यांच्यासह मुंबईवरून आलेले ई गव्हर्नन्स एक्सपर्ट देवांग दवे, तांत्रिक तज्ज्ञ शुभम पै, आपले सरकार पोर्टलचे तांत्रिक सहायक विनोद वर्मा आणि हर्षल मंत्री उपस्थित होते.
‘आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल 2.0’ बाबत अधिकारी/कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतांना देवांग दवे म्हणाले, कोणत्याही विभागाबाबतची तक्रार एकाच प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन पध्दतीने करण्याची सुविधा या पोर्टलमध्ये करण्यात आली आहे. केवळ राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारच्या विभागाशी संबधित तक्रार सुध्दा येथे नागरीकांना करता येणार आहे. पारदर्शकता, गतीमानता, जबाबदारी आणि लोकांचा विश्वास या चार बाबींवर आधारीत सदर पोर्टल अद्यावत करण्यात आले आहे.
नागरीकांची आलेली तक्रार 21 दिवसांत निकाली काढण्याचे बंधनकारक आहे. जर विहित कालावधीत तक्रारीवर कार्यवाही न झाल्यास त्यांची माहिती संबधित तक्रारकर्ता व वरिष्ठ कार्यालयास कळणार असून त्यांचेद्वारे संबंधीत अधिकाऱ्यांवर पुढील कारवाही होईल. शासकीय अधिकारी किंवा विभागाला यात कोणतीही पळवाट काढता येणार नाही. त्यामुळे संबधित तक्रारीवर योग्य आणि वेळेत निर्णय घ्यावा. या पोर्टलमध्ये जास्तीत जास्त 3 हजार शब्दापर्यंत तक्रार नोंदविता येते. आलेल्या तक्रारींचा सकारात्मक पध्दतीने निपटारा व्हावा. शासन स्तरावरून दरमहिन्याला याचा आढावा होत असतो. असे देवांग दवे यांनी सांगीतले. सदर प्रशिक्षणाला सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार विविध विभागाचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment