लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १४ जुलै : ‘विकसित भारत २०४७’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली असून, त्या दृष्टीने तयार होणाऱ्या व्हिजन डॉक्युमेंटसाठी नागरिकांनी https://wa.link/o93s9m या लिंकवर जाऊन ऑनलाईन माहिती भरून आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या दूरदृष्य प्रणालीच्या बैठकीत सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांपर्यंत ही मोहिम पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे उपस्थित होते. विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंटमध्ये कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक न्याय यांसारख्या क्षेत्रांसाठी अभ्यास समित्या स्थापन करण्यात आल्या असून या माध्यमातून राज्यातील सामान्य नागरिकांच्या गरजा, अपेक्षा, सूचना थेट शासनदरबारी नोंदवल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विभागीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हानिहाय जनसहभागातून व्यापक चर्चा व सल्लामसलती होणार असून त्याचा उपयोग २०४७ पर्यंतच्या विकास आराखड्यासाठी होणार आहे. गावपातळीवर ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शाळा-महाविद्यालयांनी नागरिक, विद्यार्थी यांना या ऑनलाईन सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.