नागपूरातील ‘दिक्षाभूमी’ साठी १७ कोटी मंजूर – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नागपूर डेस्क, दि. २५ मार्च: बुध्द धम्मातील आणि आंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागपूरातील दिक्षाभूमीसाठी केंद्र शासनाने १७ कोटी रूपये मंजूर केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिली.

येथील महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी नागपूरातील दिक्षाभूमीसाठी १७ कोटी रूपये मंजूर केल्याची माहिती दिली. यापैकी ४ कोटी रूपयांचा धनादेश  नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. उर्वरित १३ कोटी रूपये टप्प्या-टप्प्याने पाठविले जातील अशी माहिती आठवले यांनी यावेळी दिली.  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला आपल्या लाखो अनुयायांसह बुध्द धम्माची दिक्षा नागपूर येथे घेतली होती. या ऐतिहासिक घटनेनंतर या जागेला दिक्षाभूमी हे नाव प्राप्त झाले.  दरवर्षी देश-विदेशातून लाखो लोक या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन वर्धापनदिना निमित्त एकत्र येतात. त्यासाठी शासन स्तरावर विविध सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. असे आठवले यांनी सांगितलेले आहेत.