भूपतीसह ६१ माओवाद्यांनी आत्मसमर्पणाने परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू: देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : चार दशकांपासून दंडकारण्याच्या अरण्यात धगधगत राहिलेल्या नक्षल चळवळीच्या ज्वालेचा आता शेवट जवळ आला आहे. एकेकाळी संघटनेचा रणनीतिक मेंदू मानला जाणारा मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू दादा उर्फ भूपती याने आपल्या ६१ सहकाऱ्यांसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून इतिहासाचा एक नवा टप्पा उघडला आहे. तेलंगणा, छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवरील या भागातील सामाजिक-आर्थिक विकासापासून वंचित लोकांमध्ये असंतोष पसरवून नक्षल चळवळ उभी राहिली होती. कोंडापल्ली सीतारामय्या पासून सुरू झालेल्या या विचारप्रवाहाने “समता आणि बदल” या नावाखाली अनेक तरुणांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकली. पण आज या चळवळीतीलच अनेक कार्यकर्ते म्हणू लागलेत — समता ही बंदुकीच्या गोळ्यांनी नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने येते.

भूपती हा या विचारप्रवाहाचा मुख्य सूत्रधार होता. १९८०च्या दशकात अहेरी आणि सिरोंचा भागात त्याने पहिला दलम उभारला — त्यावेळी त्याचे भाऊही सोबत होते. या छोट्या संघटनेने पुढे विस्तार घेत छत्तीसगड, तेलंगणा आणि ओडिशापर्यंत जाळे पसरवले. पण काळाच्या ओघात ‘जनयुद्धा’चे स्वप्न कोसळले, आणि ‘संवादाचा मार्ग’ निवडणे अपरिहार्य ठरले. गेल्या काही वर्षांत संघटनेतील अंतर्गत मतभेद, जनाधार गमावणे आणि पोलिसांच्या कणखर मोहिमांमुळे भूपतीसारख्या नेतृत्वालाही शस्त्र खाली ठेवावी लागली.

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माओवादाच्या बीमोडासाठी घेतलेल्या निर्णायक भूमिकेचा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या अचूक रणनीतीचा हा मोठा परिणाम आहे. C-60 कमांडो दलाच्या अथक परिश्रमांमुळे, गुप्तवार्ता विभागाच्या माहितीमुळे आणि स्थानिक पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जिद्दीमुळे गडचिरोलीतील नक्षलवाद जवळजवळ संपुष्टात आला आहे.

भूपतीचे आत्मसमर्पण हे केवळ संघटनेतील एक मोठे प्रकरण नाही, तर दंडकारण्यातील नवा सामाजिक प्रवाह सुरू करणारा क्षण आहे. १ जानेवारीत त्याची पत्नी तारक्का हिने आत्मसमर्पण केले होते — त्यानंतर या प्रवाहाने वेग घेतला. आज अनेक आत्मसमर्पित नक्षल मुख्य प्रवाहात येऊन पुनर्वसनाच्या माध्यमातून नोकरी, विवाह, आणि सन्मानाचे जीवन जगत आहेत. प्रभाकरन यांच्यासारखे अधिकारी त्यांना प्रशिक्षण देऊन स्थिर रोजगार मिळवून देत आहेत.

सरकारनेही या भागात विकासाचा नवा आराखडा आखला आहे. तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, स्थानिक युवकांना औद्योगिक रोजगार देण्याचे वचन, आणि गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून ‘कर्टिन’ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत शैक्षणिक देवाणघेवाण सुरू करण्यात आली आहे. पाच कोटी वृक्ष लावून जल, जंगल आणि जमीन संरक्षणाची योजना राबवली जात आहे — ही नवी गडचिरोली विकासाची दिशा ठरत आहे.

भूपतीच्या आत्मसमर्पणाने प्रशासनाने आणि समाजाने एकत्र येऊन दाखवले की — बंदुकीचा मार्ग शेवटी संवादातच संपतो. आता गडचिरोलीच्या जंगलात उरलेले थोडके नक्षल गट छत्तीसगड व तेलंगणा सीमेवर सक्रिय आहेत; पोलिसांनी त्यांनाही मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले आहे.

राज्य सरकारने गडचिरोली पोलिसांच्या धाडसी कार्याचा गौरव म्हणून एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले — “गडचिरोली हे महाराष्ट्रातील पहिलं आत्मनिर्भर जिल्हा बनवणार आहोत; स्वप्न पूर्ण होईल.”

आता दंडकारण्याच्या जंगलात गोळीबार नव्हे, तर विकासाचे सूर घुमत आहेत. भूपतीसारख्या शस्त्रधारी योद्ध्यांनी जेव्हा संविधानाचा मार्ग स्वीकारला — तेव्हा खऱ्या अर्थाने नवा इतिहास घडला आहे.

61 Naxal surrendergadchiroli policenaxalSonu naxal surrender
Comments (0)
Add Comment