लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर,
‘संपादकीय’
छत्तीसगडातील पेदाकोरमाच्या लाल मातीवर ताजं रक्त सांडलंय. सातवीत शिकणारा तेरा वर्षांचा अनिल माडवी आता नाही. लढ्याच्या नावावर, क्रांतीच्या मुखवट्याआड लपलेल्या बंदुकांनी एका निष्पाप चेहऱ्याची कबर खोदलीय. अनिलचा गुन्हा काय होता? तो कुणाची जमीन बळकावत नव्हता, तो कोणाचा गुप्तहेर नव्हता, तो फक्त एक विद्यार्थी होता. पण नक्षलवाद्यांच्या गोळ्यांना आता पुरावे लागत नाहीत. संशय पुरेसा असतो. संशय म्हणजेच मृत्युदंड. आणि मृत्युदंड म्हणजे हुकूमशाही!
नक्षल चळवळीने आदिवासींच्या हक्कांसाठी झुंज देण्याचं स्वप्न दाखवलं होतं. पण त्या स्वप्नात आता हत्येच्या छायाचित्रांचा धुराळा भरलाय. हे जंगल, ही माती, ही जमीन जिच्यासाठी ते म्हणे लढतात, त्याच जमिनीवर आज एक बालक रक्ताने माखलाय. क्रांतीच्या नावावर बंदुक चालवणं आणि निर्दोषांचे जीव घेणं ही जर नव्या जगण्याची दिशा असेल, तर ही दिशा नाही – ही दिशाभूल आहे.
या हत्येवर राज्य नुसती ‘निंदा’ करतंय. जिल्हा प्रशासन गप्प आहे. आमदारांचा दौरा गावाच्या उलट दिशेला वळलाय. एक तेरा वर्षांचा मुलगा मेला, पण कोणाच्या प्रवासात व्यत्यय आलाच नाही. ही हत्या झालीच नाही, असं जणू ठरवून टाकलं गेलंय. जोपर्यंत हे मृतदेह निवडणुकीत मतं निर्माण करत नाहीत, तोपर्यंत ते केवळ आकड्याच आहेत.
अनिल मेला नाही – तो मारला गेला. त्याच्या हत्या ही एक “घटना” नव्हे, ती व्यवस्था झालेली आहे. उद्या दुसरा अनिल मरेल, पुन्हा तीच प्रतिक्रिया, तीच मौनाची चादर. आपण सगळे एक भयंकर सामूहिक अपराध करत आहोत – अन्याय होताना गप्प राहण्याचा अपराध. आणि हा अपराध रक्ताच्या प्रत्येक थेंबावर लिहिला जातोय.
सवाल फक्त नक्षलवाद्यांचा नाही. सवाल आपलाही आहे. आपण झपाट्याने अशा समाजात ढकलले जातोय जिथं लहानग्यांना न्याय मिळत नाही, ज्यांच्या मृत्यूवर केवळ निषेधाचे पत्रकं लिहिली जातात. अनिलच्या मृत्यूवर जर आपण उठलो नाही, तर आपल्याला पुन्हा कोणत्याच हत्येवर बोलायचा अधिकार नाही.
पेदाकोरमात आज एक अनिल गेला. उद्या तो कोणाच्या घरात असणार आहे? तुमचं? आमचं? की पुन्हा कुणा अनोळखीचं – ज्याच्या रक्तावर आपण फक्त ‘दु:ख व्यक्त’ करू?
शेवटी इतकंच… नक्षलवाद्यांच्या बंदुकीतून निघणारी गोळी आता विचारसरणीला नव्हे, तर भविष्याला भेदतेय. आणि आपण जर गप्प बसलो, तर कधी ना कधी त्या गोळ्या आपल्याही दारात थडकावणारच.