लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या मोठ्या चकमकीत २८ नक्षलवादी ठार झाल्याच्या घटनेची आता माओवादी संघटनेनेही अधिकृत कबुली दिली आहे. माओवादी कम्युनिस्ट पार्टीच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे प्रवक्ते ‘विकल्प’ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात या घटनेची पुष्टी करत मुख्य नेतृत्वाला सुरक्षा पुरवण्यात अपयश आल्याचे मान्य केले आहे. ही एक दुर्लभ कबुली मानली जात असून माओवादी संघटनेतील अंतर्गत अस्वस्थतेचाही तो संकेत मानला जात आहे.
२१ मे रोजी छत्तीसगडच्या अबुझमाड परिसरातील गुंडेकोट भागात ही चकमक घडली होती. या कारवाईत माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशव राव ऊर्फ गगन्ना ऊर्फ बसवा राजू याच्यासह एकूण २८ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आधीच सुरक्षा दलांकडून देण्यात आली होती. आता माओवाद्यांनीही आपल्या एका टॉप लिडरच्या मृत्यूची कबुली दिल्यामुळे ही चकमक ही संघटनेच्या दृष्टीने अत्यंत मोठा आघात मानला जात आहे.
‘विकल्प’ यांनी आपल्या पत्रकात केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली आहे. विकसित भारत निर्माण करण्याच्या नावाखाली सरकार कार्पोरेट हिंदू राष्ट्र उभारण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. आदिवासींच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या धोरणांचा आम्ही विरोध करत राहू, असेही विकल्प यांनी स्पष्ट केले.
सध्या नक्षल चळवळीच्या दृष्टीने ही घटना निर्णायक मानली जात असून, बसवा राजूच्या मृत्यूनंतर संघटनेच्या नेतृत्व पातळीवर मोठा रिक्त अवकाश निर्माण झाला आहे. याचा पुढील परिणाम दंडकारण्य भागातील चळवळीवर कसा होतो, याकडे सुरक्षा यंत्रणा आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.