IED स्फोटात एएसपी गिरीपूंजे शहीद!

सुकमात नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सुकमा (छत्तीसगड) | प्रतिनिधी:  छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात कोंटा विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव गिरीपूंजे शहीद झाले. कोंटा-एर्राबोर मार्गावरील डोंड्रा गावाजवळ ही घटना घडली. या स्फोटात कोंटा पोलिस ठाण्याचे ठाणेप्रमुख आणि काही जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर कोंट्यात उपचार सुरू आहेत.

नक्षलवाद्यांनी १० जून रोजी भारत बंदची हाक दिली होती. त्याच्या पार्श्वभूमीवर एएसपी गिरीपूंजे स्वतः पायदळ गस्तीसाठी उतरले होते. पण नक्षलवाद्यांनी आधीच सापळा रचून ठेवलेला होता. रस्त्याच्या खोल भागात लपवलेला स्फोटक सापळा गस्ती दरम्यान अचानक उडवण्यात आला. स्फोट इतका जबरदस्त होता की, एएसपी गिरीपूंजे यांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही.

जवान रडले, परिसर हळहळला..

गिरीपूंजे यांच्यासोबत असलेल्या जवानांनी त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. हक्काचा साहेब कायमचा निघून गेल्याचं पाहून अनेक जवान घटनास्थळीच रडू लागले. शोकमग्न वातावरणात शहीद अधिकाऱ्याचे पार्थिव उचलले गेले.

नक्षलवाद्यांचे तंत्र अधिक धोकादायक..

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आता नक्षलवादी स्फोटके २ फूट किंवा त्याहून अधिक खोल रस्त्याखाली लपवत आहेत. त्यामुळे डिटेक्टर उपकरणांनीही त्यांचा थांग लागत नाही. बीजापूरमध्येही अशाच पद्धतीने हल्ला करण्यात आला होता. हे नवे तंत्र सुरक्षा दलांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

धाडसी अधिकारी हरपला..

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आकाश राव गिरीपूंजे यांनी नक्षलप्रभावित भागात अनेकवेळा धाडसी मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. ते शिस्तप्रिय, मनमिळावू आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले आहे.

“साहेब नेहमी म्हणायचे – मी पुढे चालतोय, तुम्ही मागे उभे राहू नका… पण आज तेच पुढे गेलेत आणि आम्हाला मागे सोडून गेलेत…

👆🏻शहीद गिरीपूंजे यांच्या ताफ्यातील एक जवान, अश्रूंना वाट मोकळी करताना पुढचा मार्ग कठीण…

या घटनेनंतर नक्षलविरोधी मोहिमा अधिक बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे. ड्रोन सर्व्हेलन्स, भूमिगत स्फोटक शोध प्रणाली आणि स्थानिक माहिती तंत्रज्ञानावर आधारित कारवाया यावर भर देणं आवश्यक आहे.

शहीद गिरीपूंजे यांच्या बलिदानाला संपूर्ण देश सलाम करत असून, त्यांची शहादत व्यर्थ जाऊ नये हीच अपेक्षा!

 

ChtisghadDyspDYSP deadIED blasts in CGNaxal ied blast