नांदेड जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत मोठ्या उत्साहात शौर्य दिन साजरा करण्यात आला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड, दि. ९ एप्रिल: १९६५ मध्ये कच्छ च्या रणामध्ये केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या काही मोजक्या सैनिकांनी अतुलनिय शौर्य दाखवत पाकिस्तानी ब्रिगेड ला १२ तास रोखुन ठेवले, या युद्धात ८ जवान देशासाठी शहिद झाले. या अतुलनीय शौर्याची आठवण व त्या वीरांना नमन करण्यासाठी ९ एप्रिल हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो.
१९६५ मध्ये कच्छच्या रणात केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या द्वितीय बटालियनच्या मोजक्या सैनिकांनी देशाची अखंडता व मातृभूमीच्या रक्षणासाठी पाकिस्तानी सैन्याच्या प्रशिक्षित इन्फेन्ट्री सैनिकांच्या एका ब्रिगेडशी दोन हात केले. साक्षात मृत्यूशी लढा देऊन पाकिस्तानी सैन्याला १२ तास रोखून ठेवले, एक इंच सुद्धा हलू दिले नाही. पराक्रमाची शर्थ करीत अदम्य साहस शौर्याचा परिचय करून दिला. मातृभूमीच्या रक्षणासाठी ८ जवानांना वीरमरण आले.
देशासाठी शहीद झालेल्या या वीरांच्या शौर्याला नमन करण्यासाठी आज शौर्य दिन साजरा केला जातो. नांदेड जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत मोठ्या उत्साहात शौर्य दिन साजरा करण्यात आला. प्रशिक्षण संस्थेचे कमांडंट लीलाधर महरानियां द्वारा क्वार्टर गार्ड सलामी घेण्यात आली.
यावेळी आयोजित सैनिक संमेलनात कमांडंट लीलाधर महरानियां यांनी आजच्या शौर्य दिनाचे महत्व विशद केले. त्याचबरोबर प्रशिक्षण संस्थेचे पोलीस गेलेंट्री मेडल प्राप्त उपकमांडंट पुरुषोत्तम जोशी, उपेंद्र कुमार यादव, फिनटूस कुमार यांना ही सन्मानित करण्यात आले.