शिवछत्रपतींच्या १२ गड किल्ल्यांचं जागतिक वारसामध्ये नामांकन करण्यासाठी शिष्टमंडळ पॅरिसमध्ये

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांचं एक शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झालं आहे. वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची शिष्टमंडळानं भेट घेतली. राजे शिवछत्रपतींच्या १२ गडकिल्ल्यांचं जागतिक वारसामध्ये नामांकन झालं आहे. त्यावर पूर्णपणे निर्णय होणे बाकी आहे, या दृष्टीनं त्याबद्दलचं सादरीकरण आणि पुढील टप्प्यातल्या तयारीसाठी शिष्टमंडळासमवेत चर्चा केल्याचं शेलार यांनी समाजमाध्यमावरील संदेशात सांगितलं.

मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेअंतर्गत राज्य सरकारनं छत्रपती शिवरायांच्या रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला होता. हा प्रस्ताव पंतप्रधानांनी युनेस्कोकडे सादरीकरणासाठी पाठवला आहे.

मंत्री एॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखालील या शिष्टमंडळात, वरिष्ठ मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे.