‘स्पुटनिक-व्ही’ लसीची ऑगस्टपासून भारतात निर्मिती

मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला स्पुतनिकच्या 30 लाख डोसचा पुरवठा करण्यात येणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली 22 मे:- भारतात मे महिन्याच्या अखेरपर्यंत रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीचे एकूण ३० लाख डोस आयात होणार आहेत. तर जूनपर्यंत ५० लाख डोस आयात केले जातील असा दावा रशियातील भारताचे राजदूत डी.बाला व्यंकटेश वर्मा यांनी केला आहे. याशिवाय ‘स्पुतनिक-व्ही’ लसीची निर्मिती ऑगस्ट महिन्यापासून भारतातच होण्याची शक्यता असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. भारतात निर्मितीला सुरुवात झाल्यास देशात मोठ्या प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत.

कोरोना विरोधी लसींमध्ये केवळ एक डोस घ्यावा लागणाऱ्या ‘स्पुटनिक-लाइट’ लसीसाठी देखील भारताने रशियाला प्रस्ताव पाठवला आहे. भारताकडून या लसीसाठी मंजुरी मिळणं अद्याप बाकी आहे. तर स्पुतनिक-व्ही लसीची आयात भारतातील हैदराबाद येथील डॉ रेड्डीज लॅबरॉटरी कंपनीकडून केली जात आहे.

भारतात रशियाची लस स्पुटनिक-व्हीची किंमत निश्चित केली गेली आहे. याची किंमत 948 रुपये असेल यावर पाच टक्के जीएसटी लागल्यानंतर त्याच्या एका डोसची किंमत 995 रुपये असेल. रशियन लस स्पुटनिक-व्हीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली. कसौलीच्या सेंट्रल फार्मास्युटिकल लॅबोरेटरीकडून 13 मे 2021 रोजी ही लस मंजूर झाली होती.

कोरोनाव्हायरसच्या संसर्गाविरूद्ध रशियन Sputnik V लस वापरण्यास अधिकृत मान्यता देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या, काही अब्ज किंवा 40 टक्के लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये आता या लसीच्या वापरास मंजुरी मिळाली आहे.

covid second phasenew vaccin in indiasputnik v