त्रिवेणी कंपनीला स्थानिक स्तरावर विरोध प्रारंभ

टोपी, जॅकेटची होळी : सुरजागड लोहखनिज प्रकल्पात स्थानिक घेण्याची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,  दि. १३ जुलै : सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे काम झाले आहे. मात्र सुरजागड हे अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग असून नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जातो.

मात्र सध्या त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनी मार्फत सुरजागड पहाडावर निडरपणाने उत्खननाचे कार्य सुरु करण्यात आले असून आता स्थानिकांच्या रोषाचा व विरोधाचा सामना करावा लागत आहे. कंपनीने येथे कामासाठी परराज्यातून मजूर आणल्याने स्थानिकांनाच डावलण्याचा हेतू लक्षात घेऊन स्थानिकांनाच प्रथम  प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी काही ग्रामस्थांनी सुरजागड परिसरात कंपनीची टोपी व जॅकेट जाळून आपला रोष व्यक्त केला.

विपुल लोहखनिज असलेल्या सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाची लीज लॉयड मेटल्स कंपनीकडे होती. या कंपनीकडून उत्खननाचे अधिकार आता त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीकडे आले आहेत. या कंपनीने सुरुवातीपासूनच हॉट अ‍ॅण्ड कोल्ड धोरण अवलंबिले आहे. म्हणजे नक्षल्यांप्रती हॉट म्हणजे गरम, तर स्थानिक ग्रामस्थांप्रती कोल्ड म्हणजे थंडपणाने काम करायचे, असा एकूण कंपनीचा अजेंडा आहे.

स्थानिकांचा आपल्याला पाठींबा मिळाला की, नक्षलवादी आपले काहीच बिघडवू शकत नाहीत, असाही या कंपनीचा होरा आहे. त्यामुळेच येथील ग्रामस्थांप्रती ममत्व दाखवत या कंपनीने येथे कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर ऑक्सिजन प्लँट उभारणे, आरोग्य केंद्राची स्थापना, अशी कामे हाती घेतली आहेत. तसेच स्थानिकांना रोजगार, प्रशिक्षण देण्याबद्दलही उत्सुकता दाखवली आहे. समाजोपयोगी कार्य करण्याचे दाखवत ग्रामस्थांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी कंपनीची धडपड दिसून येत आहे.

या खेळीमुळे नक्षलवाद्यांना शह बसेल म्हणूनच या कंपनीने अदम्य आत्मविश्वासाचा परिचय देत अद्याप उत्खनन किंवा वाहतूक प्रक्रियेत पोलिस विभागाकडून कोणतीच सुरक्षा मागितली नाही. आतापर्यंत ग्रामस्थ आपल्याच बाजूने असल्याचा कंपनीला ठाम विश्वास होता. पण, रविवार (ता. ११) ग्रामस्थांनी कंपनीची टोपी व जॅकेट पेटवून त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यालाही आग लावली आहे.

आतापर्यंत स्थानिक नागरिक कंपनीच्या बाजूने होते, असेच चित्र निर्माण करण्यात आले होते. पण, आता हे चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान येथील ग्रामसभाही कंपनीच्या विरोधात असल्याचे कळते. कंपनीला स्थानिक नागरिकांसाठी येथे रुग्णालय सुरू करायचे आहे. त्यासाठी ग्रामसभेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून कंपनी प्रयत्न करत आहे.

यासंदर्भात रविवारीच ग्रामसभेची एक बैठक झाल्याची चर्चा आहे. मात्र, कंपनीचा डाव ‘आवळा देऊन कोहळा काढण्याचा’ आहे, अशा समजातून ग्रामसभेने ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याचे कळते. त्यामुळे पुढील काही दिवसांत पुन्हा विरोधाचे वारे जोरात वाहू लागण्याची शक्यता आहे. असे असले, तरी त्रिवेणी कंपनी अतिशय धीरगंभीरपणे, हिंमत न हारता व नक्षलवाद्यांच्या प्रभावाला न घाबरता आपले कार्य करत आहे. त्यांचे अधिकारी, कर्मचारी, मजूर अगदी आतपर्यंत मुक्त संचार करत नक्षलवाद्यांना जणू आव्हानच देत आहेत. त्यामुळे ही कंपनी ठरवलेले कार्य निर्धास्तपणे पूर्ण करेल, असाही विश्वास व्यक्त होत आहे.

एक अनोखा योगायोग…

काही वर्षांपूर्वी लॉयड मेटल्स कंपनीच्या वतीने सुरजागड पहाडावर उत्खननाचे कार्य सुरू झाले तेव्हा एका प्रसिद्ध डॉक्टरने कंपनी व ग्रामस्थांमध्ये मध्यस्थी केली होती. पुढे या डॉक्टरला नक्षलवादी व ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करून आपले चंबूगबाळे येथून उचलत जिल्हाच सोडावा लागला होता. एक विलक्षण योगायोग म्हणजे नव्याने आलेल्या त्रिवेणी कंपनीसाठीही एक डॉक्टरच मध्यस्थी करत आहे.

सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात वैद्यकीय सेवेऐवजी या औद्योगिक सेवेवर या डॉक्टरांनी लक्ष केंद्रित केले आहे. २०१६ मध्ये वरिष्ठ नक्षलवादी नर्मदाक्का हिने या परिसरात जाहीर सभा घेतली होती. या सभेत सुरजागड प्रकरणी अनेकांनी पैसे घेतल्याचा आरोप करत येथील कामाला विरोध करण्यात आला होता. तरीही कंपनीचे काम सुरूच होते. त्यानंतर २३ डिसेंबर २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी कंपनीची ८३ वाहने जाळून भस्मसात केली होती.

शिवाय तेव्हा उत्खननाला पाठींबा देणाऱ्या काहीजणांचे खूनही केले होते. आताही नक्षलवादी या परिसरात विरोधाची पत्रके टाकत असून याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील वाचा :

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधमास दहा वर्षे सश्रम कारावास

धक्कादायक!! गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

धक्कादायक!! नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून पाच लाखांच्या नोटांची चोरी!…

lead storysurjagad project