नीट-२०२५ निकालात महेश कुमार देशात अव्वल, अविका अग्रवाल मुलींमध्ये टॉपर — कृषांग जोशीला तिसरा क्रमांक..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, दिनांक १४ : राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) नीट-यूजी २०२५ परीक्षेचा निकाल आज जाहीर केला असून, यंदाच्या शर्यतीत राजस्थानच्या हनुमानगड येथील महेश कुमारने बाजी मारली आहे. देशभरातील लाखो स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक मिळवणारा महेश कुमार हा ७२० पैकी तब्बल ६८६ गुण घेऊन अव्वल ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेशच्या इंदूर येथील उत्कर्ष अवधिया याने स्थान मिळवले आहे, तर महाराष्ट्राच्या कृषांग जोशीने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यंदाच्या टॉप टेन यादीतील केवळ एकमेव मुलगी ठरलेली दिल्लीची अविका अग्रवाल हिने मुलींच्या गटात सर्वोच्च स्थान पटकावले आहे.

या वर्षीच्या नीट-यूजी परीक्षेला देशभरातून तब्बल २० लाखांहून अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदवला. ४ मे २०२५ रोजी ही परीक्षा एकाच दिवशी एकत्रितपणे घेतली गेली. संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेल्या या परीक्षेच्या निकालात यंदा ११ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी पात्रता प्राप्त केली आहे. तथापि, यावर्षीचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा तुलनेने कठीण असल्याने पात्रतेसाठी लागणाऱ्या गुणांच्या मर्यादेत घट झाली आहे. त्यामुळे स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे चित्र समोर आले आहे.

दरम्यान, इंदूरच्या काही परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू असताना अचानक आलेल्या वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे अनेक केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, परीक्षेचा वेळ व फॉर्मॅट दोन्ही प्रभावित झाल्याचे काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात मांडले. इंदूर येथील ७५ विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा अपूर्ण राहिल्याची तक्रार करत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने यावर ९ जून रोजी सुनावणी घेत, संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल तात्पुरता राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रीय चाचणी संस्था या ७५ विद्यार्थ्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करणार असून, त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे अद्याप संपूर्ण गुणवत्ता यादीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. तथापि, उर्वरित लाखो विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेचा शेवट करत त्यांचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला.

नीट-यूजी ही वैद्यकीय शिक्षणासाठी देशातील सर्वात मोठी व महत्त्वाची परीक्षा मानली जाते. त्यामुळे याचा निकाल केवळ शैक्षणिक टप्पाच नव्हे, तर अनेकांच्या करिअरच्या दिशादर्शक क्षणांपैकी एक असतो. देशभरातील विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेत ही परीक्षा दिली असून, त्यामध्ये यश मिळवलेल्यांचे अभिनंदन होत आहे. परंतु तांत्रिक कारणांमुळे अडचणींचा सामना करावा लागलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

 

यंदाचा निकाल संख्यात्मक आणि प्रतीकात्मकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरतो आहे. अवघ्या एकाच मुलीने टॉप १० मध्ये स्थान मिळवणे ही बाब चिंतनास भाग पाडणारी आहे, तर दुसरीकडे विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी अव्वल यादीत स्थान मिळवून परीक्षेचे राष्ट्रीय स्वरूप अधोरेखित केले आहे. यापुढे एनटीएने निकालानंतरची प्रक्रिया गतीने पार पाडावी आणि निकालांवर कोणताही वाद कायम न राहता सर्वांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.

NEETNEET resultNEET topper