निवडणूक आयोगानं मागितली आणखी माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोलकाता डेस्क 13 मार्च:– पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली आहे. मात्र, हा आपल्यावर झालेला हल्ला असल्याचा दावा ममता यांनी केला होता. चार ते पाच लोकांनी मला धक्का देऊन पाडलं, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, आता यासंदर्भात निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात त्यांनी या चार – पाच लोकांचा कोणताही उल्लेख केलेला नाही. राज्य निर्वाचन आयोगाच्या एका अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली आहे. ममता यांनी केवळ घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं यात नमूद केलं आहे.
अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, रिपोर्टमध्ये असंही म्हटलं गेलं आहे, की ज्याठिकाणी ही घटना घडली, त्याठिकाणचे कोणतेही स्पष्ट फुटेज उपलब्ध नाहीत. नंदीग्राममधील जागेसाठी आपलं नामांकन पत्र दाखल केल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 10 मार्चला मेदिनीपूर जिल्ह्यातील बिरुलिया बाजारात ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली होती. यानंतर बॅनर्जी यांनी असा आरोप केला होता, की चार-पाच लोकांच्या धक्क्यामुळे त्यांना दुखापत झाली होती.
जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं, की परिसरातील एका दुकानात सीसीटीव्ही लावलेला होता, मात्र तो काम करत नव्हता. स्थानिक लोक आणि प्रत्यक्षदर्शी यांचं याबाबत संमिश्र मत आलं आहे. त्यामुळे, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे शक्य नाही. या घटनेनंतर निवडणूक आयोगानं राज्याचे मुख्य सचिव आणि राज्यासाठी नेमलेले दोन पर्यवेक्षक यांच्याकडे अहवाल मागविला होता.