कुंभमेळा परिसरात सिलेंडर स्फोटामुळे अनेक तंबू जळून खाक, कुणालाही इजा नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

प्रयागराज: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ परिसरात रविवारी भीषण आग लागल्याचं पाहायला मिळालं. सिलेंडर ब्लास्टमुळं ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

दरम्यान या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नसल्याचंही अधिकारी आणि पोलिसांनी म्हटलं आहे.

महाकुंभ परिसरातील सेक्टर 19 च्या भागामध्ये दोन सिलिंडरलचा स्फोट झाला. त्यामुळं त्याठिकाणी असलेल्या तंबूंमध्ये आग पसरली अशी माहिती आखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी भास्कर मिश्रा यांनी दिली.

अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या आग धूर आणि विस्तव पूर्णपणे शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.