लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बीजापूर, १ मे – छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बीजापूर जिल्ह्यात माओवाद्यांच्या आत्मसमर्पणाच्या मालिकेत पुन्हा एक मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. पूर्वी बस्तर डिव्हिजनमधील परतापूर आणि पश्चिम बस्तर डिव्हिजनमधील भैरमगड एरिया कमिट्यांमधील २४ माओवादी कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनासमोर शरणागती पत्करली आहे. यातील तब्बल १४ जण हे २८.५० लाख रुपयांच्या इनामी यादीत होते. या आत्मसमर्पणामुळे प्रशासन व पोलिस दलाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
महत्त्वाच्या पदांवरील कार्यकर्त्यांचा समावेश
या आत्मसमर्पणात एसीएम (एरिया कमिटी मेंबर), पीएलजीए सदस्य (डिव्हिजन स्तर), केएएमएस (किसान आदिवासी मजार संघ) अध्यक्ष, सीएनएम सदस्य, सेक्शन डिप्टी कमांडर यांचा समावेश आहे.
याशिवाय जनताना सरकारच्या शाळांतील शिक्षक, कमकानार, सावनार, केशकुतुल, चेरली, कंचाल आरपीसीमधील सदस्यांनीही शरणागती पत्करली आहे. AOB डिव्हिजन, माड़ डिव्हिजन आणि प्लाटून नं. ३२ चे सदस्यही यामध्ये आहेत.
विकासाचा मार्ग – आत्मसमर्पणाला चालना
दुर्गम भागांत नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुरक्षा शिबिरांमुळे गावकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी पोलिस दलाला मिळत आहे. रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्यसेवा गावांपर्यंत पोहोचत असून शासनाच्या जनकल्याणकारी योजनांबद्दल जनजागृती करण्यात येत आहे.
त्यामुळे माओवादी कार्यकर्त्यांमध्ये संघटनेबाबतचा विश्वास उडाल्याची लक्षणे दिसून येत आहेत. संघटनेतील फूट आणि निराशा कारणीभूत नक्षल संघटनांतील आंतरिक मतभेद, वाढती असुरक्षा, वरिष्ठ नेत्यांची बेपर्वाई आणि स्थानिक युवकांचे शोषण या सर्व गोष्टींमुळे कार्यकर्ते निराश झाले आहेत. त्यामुळेच अनेक जणांनी सुरक्षित व सन्मानाने जगण्यासाठी मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाची पुनर्वसन योजना ठरतेय यशस्वी
छत्तीसगड शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रत्येक माओवादी कार्यकर्त्याला ५० हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात आली.
त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण, सुरक्षा आणि उद्योजकता संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
सांघिक मोहीमेमुळे यशस्वी निकाल
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच बीजापूर जिल्ह्यात 213 माओवादी कार्यकर्ते अटकेत. 203 माओवादी आत्मसमर्पित, 90 जण चकमकीत ठार.