मुख्यमंत्रीपदी सातव्यांदा शपथ घेणार नितीश कुमार,बिहारच्या अटीतटीच्या लढाईत भाजपप्रणित ‘एनडीए’चा विजय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

पाटणा, दि. ११/११/२०२०: बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात एनडीए ने स्पष्ट 125 जागा जिंकत बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे.  सर्व 243 जागांचे निकाल हाती आले असून एनडीए ने 125 जागा जिंकल्या आहेत तर महागठबंधननं 110 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने या निकालात भरारी घेतली आहे. भाजपला 2015 मध्ये 53 जागा मिळाल्या होत्या तर यंदा 74 जागा मिळाल्या आहेत. तब्बल 21 जागा जास्त जिंकून भाजपनं चांगलं यश मिळवलं आहे.

या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार सातव्यांदा शपथ घेऊन इतिहास रचणार आहे. मात्र त्यांचा पक्ष जदयूला खूप मोठा फटका या निवडणुकीत बसला आहे. 2015 साली 71 जागा जिंकलेल्या जदयूला यावेळी फक्त 43 जागांवर विजय मिळवता आला आहे. बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळालं आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं असलं तरी पक्षपातळीवर नितीशकुमारांचं मोठं नुकसान झालं आहे.

दुसरीकडे महागठबंधननं 110 जागा जिंकल्या आहेत. यात  तेजस्वी यादव यांच्या राजदनं 75 जागा मिळवल्या आहेत. राजदला 2015 साली 80 जागा मिळाल्या होत्या. पाच जागा यंदा कमी मिळाल्या असल्या तरी तेजस्वी यांचं हे एकट्याच्या बळावर आणलेलं यश मानलं जात आहे. तर गेल्यावेळी 27 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी आठ जागांवर फटका बसला असून 19 जागा मिळाल्या आहेत. राजद आणि काँग्रेसनं 2015च्या जागांचे आकडे गाठले असते तर कदाचित बहुमत त्यांना मिळाले असते.

कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या

एनडीए-125     : भाजप-74,जेडीयू-43,विकासशील इंसान पार्टी-04, हिन्दुस्तानी अवाम मोर्चा-04,

महागठबंधन-110 : आरजेडी-75,काँग्रेस-19, भाकपा-माले-12,           

  सीपीएम-02,सीपीआय-02

एएमआयएम–5,

बहुजन समाज पार्टी – 1,

लोक जनशक्ति पार्टी – 1

अपक्ष – 1

Nitish Kumar