पाच राज्यांतील निवडणुकीचा निकाल लागला, पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका सुरु

देशात तब्बल 66 दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या असून पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी महाग झालं आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 04 मे:– पाच राज्यांमधील निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारने अपेक्षेप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच पेट्रोलडिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. तब्बल 66 दिवसांनंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली असून पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी वाढलं आहे. 27 फेब्रुवारीनंतर देशात पहिल्यांदाच इंधनाची दरवाढ झाली आहे. मधल्या काळात पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने इंधानांची किंमत ‘जैसे थे’ ठेवण्यात आली होती असं सांगण्यात येतंय.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या पाच राज्यांमध्ये आता नवे सरकार स्थापन होईल. यापैकी आसाम, पुदुचेरी आणि तामिळनाडूत भाजपला अपेक्षित यश मिळाले. मात्र, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. या दोन महिन्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असूनही देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यामागे सहाजिकच पाच राज्यातील निवडणुका हे कारण होतं. मात्र जशा या निवडणुका संपल्या तसं लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. निवडणुका झाल्यानंतर आता होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की. या पुढे आता रोज पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचं काही विश्लेषकांकडून सांगण्यात येतंय.

  • मुंबई: पेट्रोल- 96.95, डिझेल 87.98
  • पुणे: पेट्रोल- 96.60, डिझेल 86.30
  • नाशिक: पेट्रोल- 97.36, डिझेल 87.04
  • औरंगाबाद: पेट्रोल- 98.19, डिझेल 89.22

देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

elecion 2021elelction overfuel rate highmodipetroliumwest bengal