पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ मध्ये गडचिरोलीच्या काटेझरी गावातील बससेवेचा गौरवपूर्ण उल्लेख

गडचिरोलीच्या विकास प्रयत्नांना पंतप्रधानांकडून सलाम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

गडचिरोली, दि. २५ : “मी तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगणार आहे जिथे पहिल्यांदाच बस पोहोचली…”, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या संवाद मालिकेतून गडचिरोली जिल्ह्यातील काटेझरी या छोट्याशा गावाचा गौरवपूर्ण उल्लेख करत, माओवादग्रस्त भागात होत असलेल्या परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी देशासमोर मांडली.

२३ मार्च २०२५ या दिवशी जेव्हा पहिल्यांदाच एस.टी. बस काटेझरी गावात पोहोचली, तेव्हा गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात तिचं स्वागत केलं. पंतप्रधानांनी या घटनेचा उल्लेख करत म्हटलं, “या गावात रस्ते होते, गरज होती, पण माओवादी धोक्यामुळे कधीच बस पोहोचली नव्हती. पण आज त्या भागात बदल दिसून येतोय.”

काटेझरी हे गडचिरोली जिल्ह्यातील एक अतिदुर्गम आणि माओवादी प्रभावाखालील गाव. अनेक वर्षांपासून या भागात वाहतुकीसाठी कोणतीही सार्वजनिक सुविधा नव्हती. गावकऱ्यांना दैनंदिन कामांसाठी मैलोन्मैल चालावं लागत होतं. पण गडचिरोली पोलीस दल, जिल्हा प्रशासन आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून शेवटी ही ऐतिहासिक बससेवा सुरू झाली.

पंतप्रधान मोदी यांनी विशेषतः या घटनेचा उल्लेख करत सांगितले की, “बस सेवा ही केवळ प्रवासाची सोय नसून, विकास, विश्वास आणि सुरक्षिततेचं प्रतीक आहे. काटेझरीमध्ये जे घडलं ते माओवादग्रस्त भागांमध्ये सामान्य परिस्थिती परत येत असल्याचं लक्षण आहे.”

या बससेवेचा फायदा फक्त काटेझरीपुरता मर्यादित न राहता, परिसरातील १० ते १२ गावांना होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या दारं खुली होतील, तर नागरिकांना आरोग्य, प्रशासकीय कामं आणि रोजगारासाठी शहरात पोहोचणं अधिक सोपं होईल.

काटेझरीतील ग्रामस्थांनीही पंतप्रधानांच्या उल्लेखानंतर अभिमान व्यक्त केला. “आमचं गाव देशपातळीवर चर्चेत आलं, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आता आम्हालाही वाटतंय की, आम्ही भारताचा खऱ्या अर्थाने भाग आहोत”, असं एका ग्रामस्थाने सांगितलं.

राष्ट्रीय ओळख, स्थानिक आत्मविश्वास

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात झालेल्या या उल्लेखामुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी मोहिमेला आणि स्थानिक विकासाला देशव्यापी मान्यता मिळाली आहे. ही केवळ बससेवा नव्हे, तर सामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवणारी विकासाची चळवळ आहे, जी आता जंगलांमधूनही उगम पावत आहे.

 

Dadaloma khidakiMan ki batModi apricated Gadchiroli police projectSP Gadchiroli