धान खरेदीसाठी तातडीने योग्य नियोजन करावे – खा. प्रफुल पटेल.

खासदार श्री पटेल यांच्या पुढाकाराने भंडारा व गोंदिया जिल्हयातील धान खरेदीबाबत मुंबई येथे आढावा बैठक संपन्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोंदिया २५ नोव्हेंबर:– भंडारा – गोंदिया जिल्हयातील धान उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर आपले धान विक्री करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेता खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने आज मुंबई येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी खासदार पटेल यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी विषयी बैठकीत चर्चा केली. दोन्ही जिल्हयात धान खरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात यावी, सुरु करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांना त्रास न होता तातडीने धान खरेदी करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात यावी, धान खरेदी केंद्र वाढविण्यात यावे व शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाचा चुकारा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा असा अनेक विषयावर खासदार पटेल यांनी चर्चा केली.

धान खरेदी विषयी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ यांना सर्व बाबींचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ यांनी दिल्या. ज्या ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहेत असा कृषी उत्पन्न बाजार समितीची मदत घेऊन धान खरेदी करण्यात यावी, मार्केटिंग फेडरेशन च्या वतीने नवीन संस्थाना धान खरेदी केन्द्र देणे व आदिवासी विकास महामंडळाने नवीन धान खरेदी केंद्र सुरु करून धान खरेदी केंद्र वाढविण्यात यावे, धान उत्पादन जास्त होणार असल्याने त्यानुसार बारदाना उपलब्धते बाबतही नियोजन करावे, तसेच या अनुशंगाने सार्वजनिक वितरण प्रणालीचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे, असा सूचना ही आढावा बैठकीत देण्यात आल्या. बैठकीत प्रामुख्याने खा. श्री प्रफुल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ, गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री व गृहमंत्री श्री अनिल देशमुख, आदिवासी विकास राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे, आमदार श्री राजु कोरेमोरे, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, सचिव, अन्न व नागरी पुरवठा, अप्पर मुख्य सचिव पणन, प्रधान सचिव सहकार, व्यवस्थापकीय संचालक, मार्केटिंग फेडरेशन, व्यवस्थापकीय संचालक आदिवासी विकास महामंडळ व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत उपस्थित होते.