पुणेरी कोरोना लशीसाठी देशांच्या रांगा; सीरमच्या अदार पूनावालांनी घेतला मोठा निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, 21 फेब्रुवारी : जगभरात पुण्यातील कोरोना लशीची मागणी वाढली आहे. भारतानं काही देशांना पुण्यात तयार झालेल्या कोविशिल्ड या कोरोना लशीचा पुरवठादेखील केला आहे. कित्येक देश अजूनही या लशीच्या प्रतीक्षेत आहेत. इतर देशांकडून होणारी मागणी पाहता ही लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे.

आधी भारतालाच प्राधान्य दिलं जाईल, त्यानंतर इतर देशांना पुरवठा केला जाईल, असं सीरमचे (SII) सीईओ अदार पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे. इतर देशांनी संयम राखावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे.

अदार पूनावाला म्हणाले, “जे देश आणि सरकार कोविशिल्डची प्रतीक्षा करत आहे, त्या सर्वांनी संयम राखावा अशी मी विनंती करतो. भारतात लशीची मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि तीच आमची प्राथमिकता आहे. भारताला आवश्यक तितका लस पुरवठा झाला की मग जगाला आम्ही लस देऊ. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत”

सीरम इन्स्टि्यूट ऑफ इंडियानं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या मदतीनं तयार केलेली ही लस आहे. ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. त्यामुळे त्याच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही या लशीच्या आपात्कालीन वापराला हिरवा कंदील दिलेला आहे. COVAX च्या माध्यमाचून संपूर्ण जगाला ही लस घेता येऊ शकते.

Adar Punavala