लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली/दंतेवाडा, २८ मे — दक्षिण बस्तरच्या अबूझमाड जंगलात २१ मे रोजी झालेल्या एका निर्णायक कारवाईत नक्षल चळवळीला आजवरचा सर्वात मोठा हादरा बसला. नक्षल चळवळीचा महासचिव आणि पोलित ब्युरो सदस्य नंबाला केशवराव उर्फ बसवराजू चकमकीत ठार झाला. या घटनेमुळे केवळ चळवळीचे नेतृत्वच कोसळले नसून, संघटनेच्या भविष्यासंदर्भात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
🛑 नेतृत्व संकट : महासचिव कोण होणार यावर साऱ्यांचे लक्ष.
बसवराजूच्या अचानक निधनानंतर CPI (माओवादी) च्या नेतृत्वात रिक्तता निर्माण झाली आहे. सुरक्षा यंत्रणा आणि खालच्या स्तरातील कार्यकर्तेही हा प्रश्न विचारत आहेत – नवीन महासचिव कोण होणार?
🧭 तेलुगू नेतृत्वाला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता संघटनेच्या नेतृत्वासाठी सध्या दोन प्रमुख दावेदारांची नावं समोर येत आहेत. दोघेही तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील आहेत.
1. थिप्पीरी तिरुपती उर्फ देवजी (वय ६८) दलित समुदायातील हा नेता २०१८ पासून सेंट्रल मिलिटरी कमिशनचा प्रमुख आहे. क्षेत्रीय कार्यकर्त्यांमध्ये त्याचा प्रभाव असून, शिस्तप्रिय नेत्या म्हणून ओळख.
2. मल्लोजुला वेणुगोपाल ब्राह्मण समाजातून असूनही माओवादी गटात महत्त्वाची भूमिका. तो प्रसिद्ध नक्षल नेता कोटेश्वर राव उर्फ किशनजीचा भाऊ आहे. किशनजीचा प्रभाव संघटनेत फार खोलवर होता. २०११ मध्ये तो पश्चिम बंगालमध्ये चकमकीत ठार झाला होता..
सूत्रांच्या मते, माओवाद्यांच्या विचारधारेवर प्रभाव टाकणारा ‘सोनू’ उर्फ अभय (मल्लोजुला वेणुगोपालचं नवं नाव) हा थिंक टँक असून, छत्तीसगड सरकारशी संवादासाठी त्याने प्रस्ताव मांडल्याचं समजतं.
⚠️ रमन्नाच्या मृत्यूनंतर दिसलेली उघडी कलह संघटनेतील आंतरविरोध आणि नेतृत्वावरील संघर्ष ही काही नवीन बाब नाही.
कोरोना काळात रमन्ना (DKSZC सचिव) याच्या मृत्यूनंतर हा संघर्ष खुलेआम समोर आला. त्याच्या जागेसाठी किशनजीची पत्नी सावित्री, गुडसा उसेंडी (रामचंद्र रेड्डी) आणि गणेश उईके यांच्यात रस्सीखेच सुरू होती.अखेरीस गुडसा उसेंडीला प्रभारी पद देण्यात आले.
⚙️ संघटनेत नेतृत्वशक्तीचा अभाव गंभीर
सध्या नक्षल चळवळीच्या नेतृत्वाचा चेहराच धूसर झाला आहे.पोलित ब्युरोमध्ये आता केवळ चार सदस्य उरलेत, बसवराजूच्या मृत्यूनंतर एकाची घट झाली. तर २४ सदस्यीय केंद्रीय समितीत फक्त ११ सदस्य कार्यरत आहेत.सदस्यांची सरासरी वयही ६२ वर्षांपेक्षा अधिक असल्यामुळे तरुण नेतृत्वाची कमतरता जाणवते.
🔁 गणपती पुन्हा येणार की प्रभारीच राहणार?
मुप्पल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती — माजी महासचिव — याने २०१८ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद सोडलं होतं तो नेपाळमार्गे फिलिपिन्सला उपचारासाठी गेल्याची माहिती आहे. तो सध्या देशात परतल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.जर लवकर पोलित ब्युरो आणि केंद्रीय समितीची बैठक होऊ शकली नाही, तर गणपतीला प्रभारी महासचिव म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं.
🧨 नव्या धोरणाची वाट पाहणाऱ्या माओवादी गटाचा उर्वरित प्रवास अंधारात..
बसवराजूच्या मृत्यूनंतर, एकेकाळचा अत्यंत केंद्रीकृत आणि अनुशासित माओवादी संघटनात्मक स्ट्रक्चर आता भराभर ढासळत चाललं आहे. नव्या नेतृत्वाच्या नावावर सहमती न झाल्यास, संघटना आणखी फाटाफूटीत जाईल, अशी भीती आहे.
🔍 नक्षल चळवळीची दिशा बदलणार?
दोन दशकांपूर्वी शहरी बुद्धिजीवी वर्गातून घडलेल्या या चळवळीचा केंद्रबिंदू आता वयस्क आणि विस्कळीत नेतृत्वावर अवलंबून आहे.
सामाजिक विषमता आणि आदिवासी हक्कांच्या मुद्द्यांवर उभा असलेला संघर्ष आता लष्करी चकमकी आणि अंतर्गत नेतृत्व संघर्षाच्या फेऱ्यात अडकला आहे.